हिंदु धर्मातील श्रद्धेचा महाकुंभ १३ जानेवारीपासून सुरू झालेला आहे. जगभरातील सेलिब्रेटी, राजकीय नेते, मुत्सद्दी, उद्योजक भाविकाच्या भूमिकेत शिरून प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. महाकुंभात सहभागी होऊन आय़ुष्य धन्य धन्य झाले, असा भाव व्यक्त करीत आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या आधी डोक्याला भस्म लावून मंदिरात दर्शनला जाणारे, गाभाऱ्यात ध्यानस्थ बसणारे दत्तात्रय गोत्रधारी काँग्रेस नेते राहुल गांधी, त्यांच्या भगिनी प्रियांका वाड्रा, महाराष्ट्रातील त्यांच्या तैनाती फौजेचा भाग असलेले ज्वलंत हिंदुत्ववादी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कुंभापासून इतके दूर का? अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे. बहुधा दिल्ली वगळता कुठेही निवडणुका नाहीत, हे त्याचे उत्तर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभात स्नान केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेकांनी इथे हजेरी लावली. पवित्र गंगेच्या प्रवाहात स्नान केले. काल भुतानचे राजे जिग्मे खेसर नांग्याल वांगचुक यांनी काल त्रिवेळी संगमात
स्नान केले. गुरु रंधवा, सुनील ग्रोवर, अनुपम खेर, मिलिंद सोमण, कबीर बेदी, रेमो डीसुझा, शंकर महादेवन यांनी महाकुंभात सहभाग घेतला. राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ति, उद्योगपती गौतम अदाणी, मुकेश अंबानी, यांनी हे तर
सहकुटुंब सहभागी झाले. दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन जॉब्स या देखील प्रयागराजमध्ये येऊन गेल्या. हृदयात श्रद्धेचा झरा प्रवाहीत असलेल्या प्रत्येकाला इथे यावेसे वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. समस्या फक्त त्यांची आहे, जे श्रद्धेचा दिखावा करीत फिरत असतात. सुमारे ७७ देशांतील १११ मुत्सद्दी कुंभात स्नान करून गेले. परंतु दत्तात्रय गोत्रधारी राहुल गांधी इथे फिरकले नाहीत. ते आणि त्यांचा परीवार श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सुद्धा सहभागी झालेले नव्हते.
महाकुंभात उत्तर प्रदेशातील त्यांच्या मित्रपक्षाचे नेते अखिलेश यादव महाकुंभात सहभागी झाले. त्यानंतर तरी राहुल गांधी इथे दाखल होतील, असे वाटत होते, परंतु प्रत्यक्षात तसे काही झालेले नाही. लोकसभेत उभे राहून महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत हजारो लोक मेल्याचे विधान त्यांनी राज्यसभेत उभे राहून केले. माझे विधान चुकीचे असू शकेल, मला खरी माहीती द्या, मी माझे विधान मागे घेऊन माफी मागेन असे खरगे
म्हणाले. माफी मागेन हा खरगेंचा कांगावा आहे. राज्य सरकारने या दुर्घटनेत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती जाहीर केली असताना मला खरी माहीती द्या, असे सांगणे हा कांगावा नाही तर काय?
आपल्या देशात जगातील सगळ्यात मोठ्या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. जगभरातील लोक यात आस्थेने सहभागी होत आहेत, काही लोक निव्वळ कुतुहलापोटी इथे आलेले आहेत. या महाकुंभात एकूण ४५ कोटी लोक
सहभागी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या महासोहळ्या बाबत आस्था, कौतूक ही तर दूरची बाब, काँग्रेसचे नेते या सोहळ्याबाबत बोटे मोडण्याचे काम करीत आहेत.
देशातील मौलानाला, पादऱ्याला अत्यंत प्रेमाने भेटणाऱ्या राहुल आणि प्रियांका यांना महाकुंभमध्ये दाखल झालेल्या संतांचे आशीर्वाद घ्यावेसे वाटत नाही. पवित्र गंगेत स्नान करावेसे वाटत नाही, महाकुंभच्या निमित्ताने हिंदू श्रद्धा आणि आस्थांच्या रंगात रंगून जावेसे वाटत नाहीत, त्याचे कारण स्पष्ट आहेत. या
आस्था त्यांना आपल्या वाटत नाहीत. त्यांच्या आस्था आणि श्रद्धांचे विषय वेगळे आहेत, हे एव्हाना देशाला समजले असले तरी हिंदूंच्या आस्थांबाबत आदर व्यक्त करण्याची गरजही त्यांना वाटत नाहीत. कारण त्यांना हिंदू म्हणून हिंदू समाजाची मतं नको असतात. त्यांना दलित, आदीवासी, ओबीसी असा जाती-
जातीत विभागलेला हिंदू हवा असतो.
हे ही वाचा:
ईडीकडून १९ ब्रोकिंग कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल
फडणवीस राजकारणातला बिनजोड पैलवान, बाहुबली!
उत्तराखंडमध्ये एका लिव्ह इन रिलेशनशिपची नोंद
महाराष्ट्रात १ कोटी तर मुंबईत १० लाख बांगलादेशी घुसखोर!
मी हिंदुत्व सोडले आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे अलिकडे प्रत्येक सभेत उपस्थित करत असतात. भगवद गीतेचा उल्लेख ते जाडजुड पुस्तक आणि कुराणाचा उल्लेख पवित्र ग्रंथ असा करणारे ठाकरे गेल्या काही वर्षात वेगळ्याच रंगात रंगले आहेत. हे त्यांच्याही लक्षात आल्यामुळे ते मी हिंदुत्व सोडले आहे
का, असा सवाल करून उपस्थितांना भुलवण्याचा प्रयत्न करीत असतात. डोक्याला चंदन-गंधाचे तिलक लावून ते प्रयागराज मध्ये दाखल झाले असते. हर हर गंगे असा गजर करत ते गंगेच्या पाण्यात स्वान करते झाले असते, तर त्यांना हा प्रश्न विचारण्याची गरज पडली नसती. आस्था हा दाखवण्याचा विषय नसतो, त्या तुमच्या शरीराच्या कणाकणात भिनलेल्या असल्या पाहीजेत. सोनिया गांधी एखाद्या ख्रिस्ती धर्मगुरू समोर कशा उभ्या राहतात, हे एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल.
या देशात उघड उघड दोन तट पडलेले दिसतात. एक तो वर्ग आहे ज्या आपल्या पूर्वापार आस्था -श्रद्धा बळकट करतोय, प्रथा-परंपरेला चढलेली झळाळी पाहून आनंदीत होतो आहे. दुसरा वर्ग तो आहे, ज्यांना या आस्था कधी आपल्या
वाटल्याच नाहीत. फक्त निवडणुकीत नाईलाजाने ढोंगबाजी करण्यासाठी जे भगवी शाल ओढतात आणि मंदीरात जातात. प्राण प्रतिष्ठा सोहळा असो वा महाकुंभ या दोन्ही सोहळ्यामुळे अशा मंडळींचा बुरखा साफ फाटला आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)