27.5 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरसंपादकीयपवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला

पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला

देवीदेवता, संतांवरील शेलक्या टीकेमुळे सुषमा अंधारे यांच्या विरोधात वातावरण तापले आहे

Google News Follow

Related

शिवसेनेच्या वाचाळ हिंदू विरोधी नेत्या सुषमा अंधारे यांच्यासाठी आता त्यांचे माजी बॉस शरद पवार मैदानात उतरले आहेत. हिंदू संताच्या विरोधात अंधारे यांच्या फाजील वक्तव्यामुळे वारकरी समाजात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. अनेक जणांनी रस्त्यावर उतरून अंधारे यांचा निषेध केला आहे.

या पार्श्वभूमीवर पवार यांनी वारकरी समाजातील काही जणांसोबत आज बैठक घेऊन त्यांना संयमाचा सल्ला दिला. हिंदू समाजाच्या प्रथा परंपरा, दैवतं, संत याबाबत केलेल्या शेलक्या टीकेमुळे सुषमा अंधारे यांच्या विरोधात वातावरण तापले आहे. अंधारे हा शिवसेनेचा हिंदूविरोधी चेहरा बनल्या आहेत. कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या अंधारे कोणाला फारशा माहिती नव्हत्या. शिवसेनेत त्यांना उपनेतेपद मिळाले. शिवबंधन बांधून अंधारेबाई राज्यभरात फिरू लागल्या.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते, भाजपा आणि रा.स्व.संघातील नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू लागल्या. टीका करताना त्या नेहमी भाऊ, दादा, तात्या असे नातेवाचक शब्द वापरत असल्यामुळे त्यांनी पवित्र नात्यांनाही बदनाम करण्याचे काम केले. संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांच्याविरुद्ध बिनडोक टीका केल्यामुळे हिंदू समाजात त्यांच्याविरुद्ध संतापाचे वातावरण निर्माण झाले.

आपले जुने व्हीडीयो फिरवले जात असल्याचा दावा करून अंधारे यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण व्यक्त केलेले मत चुकीचे होते, विखारी होते, समाजात तेढ निर्माण करणारे होते हे मात्र त्या मान्य करत नाहीत. त्यावेळी व्यक्त केलेली मतं म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता, आता माझे मत बदलले आहे, अशी स्पष्ट कबूली देईपर्यंत हिंदू समाजात त्यांच्याविरोधात असलेला संताप कमी होण्याची शक्यता कमीच. या पार्श्वभूमीवर वारकरी समाजातील काही निवडक मंडळींना पवार आज सकाळी भेटले. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित होते. पवारांनी वारकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांना संयमाचा सल्ला दिला आहे म्हणे.

हे ही वाचा:

बॉम्बने उडविण्याच्या धमकीमुळे देवकीनंदन महाराजांना सुरक्षा

पनगरातील भाडेकरू इमारतींना न्याय मिळणार!

तुनिषा शर्माने आत्महत्या करण्यापूर्वीची ती १५ मिनिटे महत्त्वाची!

अभिनेता सुशांत सिंहची आत्महत्या नाही तर हत्या

म्हणजे शेण खाणारा राहिला बाजूला पवार वारकऱ्यांना संयमाचा सल्ला देऊन मोकळे झाले. वारकऱ्यांनी संताच्या खऱ्या साहीत्याचा प्रचार व्हावा अशा भावनाही पवारांनी व्यक्त केल्या आहेत. अंधारेबाई पवारांच्या ब्रिगेडी शाळेत तयार झाल्या. जातीचे राजकारण, ब्राह्मणांना शिव्या घालणे, हिंदूंच्या इतिहासाचे हिरवेकरण हा ब्रिगेडी कार्याचा कणा. या सर्व गुणांमध्ये अंधारे बाईंना उत्तम गती लाभली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या जे करत होत्या तेच आता त्या शिउबाठामध्ये येऊन करतायत. हिंदू धर्माला शिव्या घालणे आणि इस्लामची भलामण करणे याचाही यात समावेश आहे.

राष्ट्रवादी आणि शिउबाठामध्ये फरक एवढाच कि तिथे पवारांचे दमदार नेतृत्व होते इथे उद्धव ठाकरे यांचे बुळबुळीत नेतृत्व आहे. त्यामुळे पूर्वी ज्या अंधारेंना महाराष्ट्रात मुठभर लोक ओळखत होता, त्या शिउबाठातील अनेक नेत्यांनाही जड झाल्या. संजय राऊतांपेक्षा त्यांची जास्त चर्चा सुरू झाली. त्या पवारांच्या शिष्या असल्यामुळे संजय राऊत यांच्या त्या गुरू भगिनी आहेत. त्यामुळे शिवसेनेत अन्य नेत्यांना चेपून ठेवणाऱ्या राऊतांचे अंधारे बाईंवर फार काही चालत नाही. पवारांनी शिवसेनेची वाट लावण्यासाठी पेरलेली ही दोन महनीय व्यक्तिमत्व आहेत.

संजय राऊतांच्या कलागुणांची, पवारप्रेमाची ओळख महाराष्ट्राला अलिकडेच झाली. परंतु अंधारे यांच्याबद्दल पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राला हे ठाऊक आहे. महाराष्ट्रात विखाराचे निर्माण करणाऱ्या अंधारेंना पवार त्यामुळेच शहाणपणाचा सल्ला देण्याची शक्यता नाही, कारण त्या पवारांचा अजेंडा राबवतायत. उद्धव ठाकरेंनाही ते हवे आहे कारण अंधारे जेवढा हिंदू धर्मीयांचा अपमान करतील तेवढाच ठाकरेंवर अल्पसंख्यकांचा विश्वास वाढेल अशी शक्यता आहे. त्यामुळे पवारांनी संयमाचा सल्ला वारकऱ्यांना दिला आहे.

पवारांना ही जी काही वारकरी मंडळी भेटतात, ती नेमकी कोण हे मात्र महाराष्ट्राला कधी कळत नाही, त्यांची नावे कळत नाहीत की त्यांच्या संघटनांची नावे कळत नाहीत. त्यामुळे पवारांना भेटणारे हे वारकरी नेमके कोण, वारकरी समाजात त्यांचे स्थान नेमके काय, याबाबत महाराष्ट्रातील जनता कायम संभ्रमात असते. पवारांनी वारकऱ्यांसोबत काही महिन्यांपूर्वी अशीच एक बैठक केली होती. याबैठकीत पवार वारकऱ्यांना काय म्हणाले तेवढेच बाहेर येते. वारकऱ्यांनी पवारांकडे नेमके काय मुद्दे मांडले याबाबत वाचक अंधारात असतात.

वारकरी समाजात अंधारेबाईंबाबत निर्माण झालेल्या आक्रोशाची अंधारेबाईंनी खिल्ली उडवलेली आहे. हे वारकरी भागवद पंथीय नसून मोहन भागवत पंथीय आहेत, अशी फालतू कोटी त्यांनी केलेली आहे. अर्थ स्पष्ट आहे. हिंदू धर्माची नालस्ती अंधारेबाई यापुढेही सुरू ठेवणार. त्यांना बदललेल्या हिंदू समाजाची पुरती ओळख पटलेली नाही. पुरोगामी आणि नास्तिक पवारांना मंदीराच्या वाटेवर आणण्या इतपत हिंदू समाज जागा झाला आहे. त्यामुळे त्यांचे प्यादे असलेल्या अंधारेबाईंना तो बधण्याची शक्यता नाहीच. बाकी यानिमित्ताने अंधारे बाईंच्या पाठीशी पवार आहेत, या चर्चेवर या बैठकीच्या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले हे खरेच आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा