जर तुम्हाला सोडा, एनर्जी ड्रिंक, स्पोर्ट्स ड्रिंक किंवा फळांचा रस प्यायला आवडत असेल, तर सावध रहा. एका अभ्यासानुसार, अशा गोड पेयांचे सेवन केल्यास टाईप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
पण जर साखर असलेले अन्न पौष्टिक असेल, जसे की संपूर्ण फळ, दूध किंवा संपूर्ण धान्य, तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा अन्नामध्ये फायबर, प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात, जे साखर शरीरात हळूहळू पचवायला मदत करतात. त्यामुळे रक्तातील साखरेचा परिणाम हळूहळू होतो आणि शरीराला ताण लागत नाही.
हा अभ्यास अमेरिकेतील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केला असून, ‘एडव्हान्सेस इन न्यूट्रिशन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासासाठी ५ लाखाहून अधिक लोकांचा डेटा विश्लेषित करण्यात आला.
अभ्यासात असे आढळले की, जर एखादा व्यक्ती रोज ३५० मिलीलीटर गोड पेय (सॉफ्ट ड्रिंक, एनर्जी ड्रिंक किंवा स्पोर्ट्स ड्रिंक) घेत असेल, तर त्याला मधुमेहाचा धोका २५ टक्क्यांपर्यंत वाढतो. तसेच, रोज २५० मिलीलीटर फळांचा रस (१००% ज्यूस, नेक्टर किंवा जूस ड्रिंक) प्याल्यास धोका ५ टक्क्यांपर्यंत वाढतो.
या अभ्यासातील मुख्य शास्त्रज्ञ केरन डेला कोर्टे यांनी सांगितले की, हा पहिलाच अभ्यास आहे ज्यात साखरेच्या वेगवेगळ्या स्रोतांमुळे टाईप २ मधुमेहाच्या धोका कसा वाढतो, हे स्पष्टपणे दाखवले आहे. साखर पीण्याने अन्नाप्रमाणेच नाही, तर अधिक गंभीर परिणाम होतात.
शोधकांच्या मते, गोड पेयांमधील साखर थेट शरीरावर परिणाम करते, ज्यामुळे यकृतावर ताण येतो, चरबी वाढते आणि इन्सुलिन योग्य प्रकारे कार्य करत नाही.
त्यामुळे तज्ञांचा सल्ला आहे की, गोड पेय आणि रसांचा वापर कमी करावा आणि यावर कडक निर्बंध लावले पाहिजेत, कारण हे आपला मेटाबॉलिक आरोग्य धोक्यात टाकू शकतात.
