राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेत ठाकरे गटावर जबरदस्त तोफ डागली. यावेळी त्यांनी नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाविषयीही भाष्य केले. राजन साळवी यांनी खरं तर अडीच वर्षांपूर्वीचं शिवसेनेत यायला हवे होते, पण ते आता आपल्याकडे आलेत. कोकणात एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेत का येत आहेत? ज्या पक्षाला विचारांची वाळवी लागली त्या पक्षात राजन साळवी तरी कसे राहतील? मग तेही आले शिवसेनेत, अशी तिखट टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
राजकारणात पदं वर खाली होतात. ‘लाडका भाऊ’ ही नवीन ओळख मिळली आहे आणि ओळख सर्व पदांपेक्षा मोठी आहे. खोके खोके बोलणाऱ्यांनं या महाराष्ट्राने घरी बसवलं आहे. तरीही त्यांना कळत नाही. रस्सी जळाली पण पिळ जात नाही, अशी यांची अवस्था झाली आहे, असेही म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे.
शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कुणी मालक नाही; ना कोणी नोकर आहे. सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. लोकांना सोन्याचे दिवस दाखविण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. आमची सुरुवात अडीच वर्षांपूर्वी झाली. तो वेग आता आपल्याला दाखवायचा आहे. आम्ही घरात बसून सरकार चालवले नाही, लोकांसाठी रस्त्यावर फिरलो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
हे ही वाचा..
४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद
ट्रम्प, नेत्यान्याहू यांच्या इशाऱ्यानंतर हमास नरमला; तीन इस्रायली बंधकांना सोडले
शनिदेवाची मूर्ती असलेल्या शीळेवर आता ब्रँडेड तेलच अर्पण करता येणार
शनिदेवाची मूर्ती असलेल्या शीळेवर आता ब्रँडेड तेलच अर्पण करता येणार
आधी म्हणायचे की, कोण एकनाथ शिंदे, कोण रामदास कदम? पण आम्ही कोण आहोत हे त्यांना दाखवून दिलं. आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे आणि न्याय देणारे लोक आहोत. अडीच वर्षांपूर्वी या देशानेच नाही तर जगाने याची नोंद घेतली आहे. आरोप आणि टीका करण्यापेक्षा लोक तुम्हाला का सोडत आहेत? याचे आत्मपरिक्षण करा. दाढीने तुम्हाला अगोदर कमाल दाखवली आहे. मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही तर मी कामाने आरोपाला उत्तर देतो, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.