28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणढोंग, लबाडीची ‘केजरीवाल फाइल्स’

ढोंग, लबाडीची ‘केजरीवाल फाइल्स’

Google News Follow

Related

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला करमुक्त करण्याची काय गरज आहे? तो युट्यूबवर टाकला तर असाही लोक मोफत पाहू शकतील – इति दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. दिल्ली विधानसभेतील भाषणात या मुख्यमंत्र्यांनी हे निर्लज्ज विधान केले आणि त्यांच्यासह त्यांचे आमदार फिदीफिदी हसू लागले. केजरीवाल यांचा तो भेसूर चेहरा देशाने पाहिला. हे त्यांचे विधान निर्लज्ज यासाठी की याच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याआधी आलेल्या ८३, सांड की आँख, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांना याच दिल्लीत करमुक्त करण्याची घोषणा केली होती. ते चित्रपट का करमुक्त केले होते आणि आता द काश्मीर फाइल्स हा चित्रपट का करमुक्त करता येणार नाही, हे काही त्यांना सांगता आलेले नाही. पण काश्मीर फाइल्स जर यूट्युबवर टाकून मोफत सगळ्यांनाच बघण्याचा आग्रह केजरीवाल धरत आहेत तर मग त्यांनी ज्या चित्रपटांना करमुक्त केले ते चित्रपटही असेच यूट्युबवर टाकले असते तरीही ते मोफत सगळ्यांना पाहता आले नसते का? पण केजरीवाल यांच्याकडे त्यांची उत्तरे नसणार. कारण आपण सत्यवादी असल्याचे ढोंग करण्यात त्यांचा हात धरणारा दुसरा कुणी नाही.

हा चित्रपट मुळात प्रेक्षकांचे मनोरंजन करत नाही तर ३२ वर्षांपूर्वी काश्मिरी पंडित किंवा काश्मिरी हिंदूंच्या बाबतीत जे भयंकर अत्याचार झाले, त्यांना काश्मिरातून नेसत्या वस्त्रानिशी हुसकावून लावण्यात आले त्याचे चित्रण हा चित्रपट करतो. पण या चित्रपटाला केजरीवाल ‘झुठी फिल्म’ ठरवतात. अशा खोट्या चित्रपटांची प्रसिद्धी करण्याची गरज काय, असा त्यांचा सवाल असतो. मग ज्या चित्रपटांना केजरीवाल यांनी करमुक्त केले, त्या चित्रपटांत कोणती सच्चाई दाखविली होती, हेही एकदा केजरीवाल यांनी जरा देशाला सांगावे. अवघा देश हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्समध्ये गर्दी करत आहे, लोक भावूक होऊन चित्रपट पाहात आहेत आणि काश्मिरी पंडितांच्या दुःखात समरस होत आहेत, हे केजरीवाल यांनी बहुतेक पाहिलेले नसावे. त्यांनी तर हा चित्रपटही पाहिला नसावा. बाकी ज्या चित्रपटांना ते करमुक्त करतात त्यांच्या स्क्रीनिंगला मात्र ते आवर्जून जातात, त्या कलाकारांसोबत फोटोही काढतात.

भाजपाशी त्यांचे राजकीय जे काही वैर असेल ते असेल पण केजरीवाल यांची आणखी एक लबाडी म्हणजे ते भाजपाला कुत्सितपणे सवाल विचारतात की, तुम्ही या चित्रपटाचे पोस्टर्स देशभरात सगळीकडे का लावत आहात? तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार आहात का की, आपण एका चित्रपटाचे पोस्टर्स लावतो म्हणून…केजरीवाल यांचे हे विधान आपल्या सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडते. कारण हा माणूस या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यात इतका कसा काय माहीर आहे, याचा राहून राहून विचार मनात येतो. हेच केजरीवाल जवळपास १३-१४ चित्रपटांबद्दल ट्विट करतात आणि तो चित्रपट लोकांनी का पाहावा म्हणून लोकांना आवाहन करतात. बँग बँग, सत्याग्रह, पीके, नील बट्टे सन्नाटा, उडता पंजाब, नीरजा, वन्स अपॉन अ टाइम इन बिहार, सिक्रेट सुपरस्टार, आर्टिकल १५, मॉम, हमने गांधी को मार दिया, सांड की आँख, मसान, ८३…ही त्यांनी ट्विट केलेल्या काही चित्रपटांची यादी. मग केजरीवाल या चित्रपटांबद्दल ट्विट करण्यापूर्वी आपल्या मुलाबाळांना सांगून मगच ट्विट करत असावेत?

चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट आवर्जून पाहा म्हणून लोकांना आवाहन करणारा हा देशातला पहिला मुख्यमंत्री असेल. बरे, या चित्रपटांचे प्रमोशन करताना या व्यक्तीच्या डोक्यात राजकारण असतेच. सांड की आँख, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटात काम करत असलेल्या कलाकार तापसी पन्नू, स्वरा भास्कर या केंद्रातील भाजपा सरकारविरोधात नियमितपणे आक्रस्ताळी भूमिका घेत असतात. त्यांना एकप्रकारे समर्थन देण्याचे काम या चित्रपटांना करमुक्त करून केजरीवाल करतात. चित्रपट करमुक्त करण्यामागे ही लबाड वृत्तीही लपलेली आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी केली जात असेल तर ती अमान्य करायला हरकत नाही. प्रत्येक सरकारची भूमिका असेल पण त्यामागे ठोस कारण आणि आधार तर हवा. पण ते न करता सभागृहात उपस्थित आम आदमी पार्टीच्या आमदारांनी चित्रपटाची चेष्टा उडविली, केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर ते फिदीफिदी हसले हा वाह्यातपणा होता. महाराष्ट्रात हा वाह्यातपणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. मध्यंतरानंतर चित्रपट कंटाळवाणा होतो, लोकांना झोप येते असे विधान ते विधिमंडळात करतात. आपण विधिमंडळात कशासाठी आहोत, कशासाठी आपल्याला लोकांनी निवडून दिले आहे, याचे भान या नेत्यांना नाही. बरे, टॅक्स फ्री केल्याने जर तिकिटांची रक्कम कमी होणार असेल आणि लोकांना कमी पैशात चित्रपट पाहता येणार असेल तर ते केजरीवाल यांना नको आहे. पण एरवी बाकी सगळ्या गोष्टी दिल्लीच्या जनतेला फुकट वाटण्याची त्यांना भारी हौस. एवढीच या चित्रपटाबद्दल घृणा आहे तर मग त्या चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटातून मिळणारा कर तरी दिल्ली सरकारने आपल्या तिजोरीत का टाकावा? मात्र याच ‘खोट्या’ चित्रपटातून मिळणारा कर याच केजरीवाल यांना हवा आहे. केजरीवाल यांचे ढोंग हे यात आहे. हा चित्रपट यूट्युबवर टाकून मोफत लोकांना बघायला देण्याची सूचना जेव्हा केजरीवाल करतात तेव्हा राज्य सरकारच्या जाहिरातींच्या बाबतीतही हा विचार दिल्ली सरकारचे प्रमुख म्हणून केजरीवाल यांनी करायला हरकत नाही. कशाला लोकांचे करोडो रुपये तरी त्यांनी जाहिरातींवर खर्च करावेत. स्वतःची जाहिरात करून टाकावी यूट्युबवर. पण यावर केजरीवाल बोलणार नाहीत, कारण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला जागे करता येत नाही.

भाजपाशी त्यांचा उभा दावा आहे. दिल्ली विधानसभेतील भाषणात ते भाजपाच्या कार्यकर्ते, नेत्यांची काय अवस्था झाली आहे, असे म्हणत त्यांनी आम आदमी पार्टीत यावे अशी कुत्सित विनंती करतात. अशा या भाजपाच्या केंद्रातील सरकारकडे मात्र कटोरा घेऊन जायला केजरीवाल यांच्या पक्षाला अजिबात लाज वाटत नाही. पंजाबमध्ये नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले भगवंत मान पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून पंजाबला दोन वर्षांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज देण्याची मागणी करतात, तेव्हा भाजपासारख्या पक्षाकडे आपण ही मागणी का करतो आहोत, असा प्रश्न मनात येत त्यांचा स्वाभिमान का जागा होत नाही? पंजाबवर आज ३ लाख कोटींचे कर्ज आहे. ते फेडण्यासाठी ही मागणी केजरीवाल यांचा आप पक्ष करतो. त्यापेक्षा आम्हीच एक लाख कोटी रुपये पंजाबसाठी उभारू आणि पंजाबला समृद्ध करू अशी घोषणा केजरीवाल ताठ मानेने का करत नाहीत? कपिल शर्माच्या शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींची थट्टा करून नंतर त्यांच्याकडूनच एक करोड दो ना अशी मागणी करणाऱ्या ‘सपना’ या कृष्णा अभिषेकच्या पात्राप्रमाणेच केजरीवाल यांची करणी आहे.

हे ही वाचा:

पुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार

‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’

मुख्यमंत्री योगींच्या पहिल्याच बैठकीत मोठी घोषणा!

मुख्यमंत्री गुड गोइंग ते बॅड गोइंग

 

कोरोनाच्या काळात याच केजरीवाल यांनी मागणी केली होती की, भारतात बनणाऱ्या लशी आमच्या मुलांना मिळायला हव्यात अन्य देशांना त्या देऊ नका. तसे पोस्टर्स त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतल्या गरीब, मजुरांकडून सगळीकडे लावून घेतली होती. पण परदेशातून आलेल्या ऑक्सिजन टँकर्समधला ऑक्सिजन त्यांनी निर्लज्जपणे घेतला होता. तेव्हाही त्यांना स्वाभिमानाने हे सांगता आले असते की नको तुमचा ऑक्सिजन ठेवा तुमच्या मुलाबाळांसाठी. आम्ही करू आमची व्यवस्था. पण परदेशातून आलेला ऑक्सिजन चालतो, मात्र आपल्या लशी त्या देशांना मदत म्हणून पाठविल्या असतील तर त्याला मात्र विरोध. केजरीवाल यांचा हा आपमतलबी चेहरा आहे.

‘द काश्मीर फाइल्स’च्या निमित्ताने केजरीवाल यांचा हा ढोंगी आणि बनेल चेहरा लोकांनी दिल्ली विधानसभेत पाहिला आहे. काश्मिरी पंडितांची मते कदाचित त्यांना नको असतील. पण शाप मात्र त्यांना घ्यावेच लागतील. ते नको म्हणून टाळता येणार नाहीत. एका टीव्ही चॅनेलवरील चर्चेत चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित म्हणाले होते की, ‘ज्यांनी ज्यांनी काश्मिरी पंडितांच्या दुःखावर डागण्या दिल्या ते नेस्तनाबूत झाले आहेत.’ काश्मिरी पंडितच कशाला, कोणत्याही पीडितांच्या दुःखावर कुजकट हसणाऱ्यांना कर्माची फळे भोगावी लागतातच. केजरीवाल यांनी आपले ते हसू आणि ती विधाने कायम लक्षात ठेवावीत, आगामी काळात आत्मपरीक्षण करताना ही कर्म आठवावी लागतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा