30 C
Mumbai
Sunday, July 25, 2021
घरराजकारणकृपा भैया... पावन झाले

कृपा भैया… पावन झाले

Related

राजकारणाच्या बाजारात मूल्यांचे पोतेरं झालंय. सोय आणि फायदा हाच राजकारणाचा कायदा झालाय. पक्षप्रवेश आणि कोलांट्या हा तर राजकारणाचा अविभाज्य भाग. आज भाजपा प्रदेश कार्यालयात कृपाशंकर सिंह यांचा पक्षप्रवेश पार पडला. काही दिवसांपूर्वी त्यांनी उत्तर भारतीय समाजाला जोडण्यासाठी संपर्क यात्रा काढली होती. ही यात्रा म्हणजे त्यांच्या पक्षप्रवेशाची नांदी होती. वयाच्या सत्तरीत असलेल्या कृपा भैयांनी उत्तर भारतीय समाजातील वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना भेटून आपल्या ताकदीची चाचपणी केली. पक्षप्रवेशाच्या इराद्याचा खुंटाही हलवून बळकट केला.

ते भाजपामध्ये येणार असल्याची अटकळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हापासून बांधण्यात होती. मध्यंतरीच्या काळात ते येणार येणार अशी चर्चा बऱ्याचदा झाली. अखेर ते आज आले, पावन झाले.

काल पासून त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या आल्यानंतर भाजपा समर्थकांच्या एका गटात अस्वस्थता होती. रा.स्व.संघ, हिंदुत्वाचा विचार मानणाऱ्यांनी ‘२६/११ आरएसएस की साजिश’ या अझीज बर्नी लिखीत या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात व्यासपीठावर मुकेश भट, दिग्विजय सिंह अशा कुख्यात हिंदुविरोधींसोबत असलेल्या कृपाशंकर यांचा फोटो शेअर करून सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. २६/११ रोजी मुंबईवर झालेला हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृत नसून हिंदुत्ववाद्यांनी घडवला होता, ही उफराटी थिअरी या पुस्तकात मांडण्यात आली होती. निवृत्त आय़पीएस एस.एम.मुश्रीफ यांच्या ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकातही हीच थिअरी मांडली होती. हिंदू दहशतवाद नावाचे जे कारस्थान यूपीएच्या काळात रचले गेले, त्या कटाचा २६/११ आरएसएस की साजिश’ आणि ‘हू किल्ड करकरे’ ही पुस्तके अविभाज्य भाग होती.

कोण आहेत हे लोक जे कृपाशंकर सिंह यांच्या प्रवेशाबाबत संताप व्यक्त करतायत? हे ते लोक आहेत, जे भारताच्या राजकारणात हिंदुत्वाला कवडीमोल किंमत होती तेव्हापासून हा विचार उराशी घट्ट कवटाळून बसलेत. कलम ३७०, राममंदीर, समान नागरी कायदा हे विषय ज्यांना रोजी-रोटी इतकेच प्रिय आहेत. जे घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजतात, सोशल मीडियावर कोणी हिंदुत्वाबद्दल बोलले घरावर हल्ला झाल्यासारखे तुटून पडतात, हिंदुत्ववादी लिखाण करून ट्रोलरच्या शिव्या खातात, हिंदुत्ववादी असल्यामुळे क्षमता असून ज्यांना संधी नाकारल्या गेल्या, पण तरीही ज्यांनी हिंदुत्वाची कास सोडली नाही, अशी ही बिनपगारी फुल्ल अधिकारी मंडळी आहेत. भाजपाची सत्ता आली तर त्यांना कोणताही लाभ होण्याची शक्यता नाही, लाभाचा विचार ज्यांच्या कधी डोक्यातच नसतो, असे हे लोक.

विधानसभा निवडणुकीच्या आधीही असाच एक पक्ष प्रवेश होणार होता. परंतु हिंदुत्ववाद्यांनी कडाडून विरोध करून तो प्रयत्न हाणून पाडला. आज हा नेता ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहे.

कृपाशंकर सिंह यांनी कलम ३७० च्या मुद्यावर काँग्रेसशी फारकत घेतली होती, त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करून भाजपा समर्थक गप्प बसले असावेत.

पक्षाच्या विस्तारासाठी इतर पक्षातील तालेवार नेत्यांना सामावून घेण्याची भूमिका भाजपाने घेतली. राजकीय दृष्ट्या ती योग्यही आहे. परंतु जे बाहेरून येतायत, त्यांना वैचारीकदृष्ट्या रिचवण्याची क्षमता पक्षाने वारंवार तपासून घेतली पाहीजे. रा.स्व.संघाच्या उण्यापुऱ्या ९५ वर्षांच्या तपस्येतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आले. मस्तकाला चंदन लावून गंगा आरती करणारे, स्वच्छ काऱभार आणि प्रचंड कर्तृत्व असलेले मोदी देशातील तमाम राष्ट्रवादी शक्तींचे आयकॉन झालेत. मोदींच्या व्यक्तिमत्वातला भगवा रंग लोकांना भावतो. निवडणूक कोणतीही असो, त्यांच्याकडे पाहून लोक कमळावर शिक्का मारतात. भाजपा सुर्य अवघ्या देशावर तळपतोय तो केवळ मोदींच्या नेतृत्वामुळेच. त्यामुळे भाजपाच्या या वाहत्या गंगेत डुबकी मारण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यातले अनेक पावनही झालेत.

आज कृपा भैय्याही पावन झाले. त्यांच्या क्षमता अफाट आहेत, त्याच्याच बळावर त्यांची कारकीर्द घडली. कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले. ते दिवंगत विलासराव देशमुख यांचे अत्यंत खास होते. काँग्रेस हायकमानने देशमुखांना मुख्यमंत्री पदावरून नारळ दिल्यानंतर ते सुशीलकुमार शिंदे यांचे खास बनले. सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांचे अगदी निकटचे संबंध आहेत. उत्तर भारतीय समाजात आज तरी त्यांच्या उंचीचा दुसरा नेता नाही. सकाळी ७ वाजल्यापासून ज्यांच्या गाठीभेटी सुरू होतात, जे १८ तास सलग काम करू शकतात, ज्यांच्या डोक्यावर कायम बर्फ असतो, जीभेवर साखर असते, असा हा नेता आहे. त्यामुळे कृपा भैयांच्या प्रवेशामुळे भाजपाला बळकटी मिळेल यात शंकाच नाही.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील हे नेते मोदी मंत्रिमंडळात निश्चित?

एअर इंडिया, बीपीसीएल पाठोपाठ ‘या’ कंपनीचेही खासगीकरण

एकनाथ खडसेंचा जावई ईडीच्या ताब्यात

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं ९८ व्या वर्षी निधन

पण मोत्यांच्या माळेत राम शोधणाऱ्या हनुमानांची संख्या भाजपामध्ये मोठी आहे. ‘जो नही है राम का, वो नही है काम का’, अशी मानसिकता असलेल्या हनुमानांसाठी ‘शंभर सदगुण असून हिंदुत्व नसलेल्यांची किंमत शून्यच’.

Every saint has a past and every sinner has future

अशी इंग्रजीत एक म्हण आहे. त्यामुळे आशा बाळगायला काहीच हरकत नाही. उत्तर भारतीयांमध्ये भाजपाचा झेंडा जोरात फडकवताना कृपा भैय्या ‘जय श्रीराम’चा नारा बुलंद करतील अशा आशा करूया.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,287अनुयायीअनुकरण करा
2,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा