आंध्र प्रदेशात योगदिनाच्या निमित्ताने आयोजित ‘योगांध्र २०२५’ या भव्य कार्यक्रमाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेचे अभिनंदन करताना सांगितले की, “जनतेने ज्या उत्साहाने योगाला आपले जीवनाचे अविभाज्य अंग बनवले आहे, ते प्रेरणादायी आहे.”
पंतप्रधान मोदींनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या पोस्टला एक्सवर (पूर्वीचा ट्विटर) रीपोस्ट करत लिहिले, “योग लोकांना एकत्र आणतो. आंध्र प्रदेशच्या जनतेचे अभिनंदन, त्यांनी योगाला जीवनाचा भाग बनवण्यासाठी उभ्या केलेल्या चळवळीचे कौतुक करावे तितके कमी आहे. ‘योगांध्र’ उपक्रम आणि विशाखापट्टणममधील कार्यक्रमात मीही सहभागी होतो, हे कार्यक्रम आरोग्य आणि कल्याणासाठी अनेकांना प्रेरणा देतील.”
हे ही वाचा:
आणीबाणीच्या काळात राष्ट्र सेविका समितीचे योगदान
‘इस्रायलने जे सुरू केलं, अमेरिकेने ते पूर्णत्वास नेलं’
अमेरिकेने केला इराणवर हल्ला; तीन आण्विक केंद्रांना केले लक्ष्य
कढीपत्ता : आरोग्याचा अमूल्य खजिना
मुख्यमंत्र्यांचे कौतुक
मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी देखील या रेकॉर्डला आंध्र प्रदेशच्या नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांचे यश असल्याचे सांगत म्हटले की, “मी सर्व जनतेचे आभार मानतो ज्यांनी हे शक्य केले. तुमचा उत्साह आणि समर्पण प्रेरणादायी आहे. जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा कोणतेही उद्दिष्ट अशक्य नसते.”
या कार्यक्रमात एकूण ३ लाख १०५ लोकांनी सहभाग घेतला, ज्यामुळे “इतिहासातील सर्वात मोठ्या योग सत्राचा” नवा विक्रम झाला. पंतप्रधान मोदींनी आर.के. बीचवर कॉमन योग प्रोटोकॉल सादर करत योग सत्राचे नेतृत्व केले. त्यांच्या बरोबर मुख्यमंत्री नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि इतर केंद्रीय व राज्य मंत्री उपस्थित होते. हे आयोजन आर.के. बीच ते भोगापुरमपर्यंत आयोजित करण्यात आले होते. याने २०२३ साली सूरतमध्ये १ लाख ४७ हजार लोकांच्या केलेल्या विक्रमाला मागे टाकले.
आयोजनाच्या एक दिवस आधी विशाखापट्टणममध्ये २२ हजार १२२ आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्रित सूर्यनमस्कार सादर करत आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. एकूण मिळून राज्याने गिनीज बुकमध्ये २१ मान्यतांचे विक्रम मिळवले, ज्यात त्यांची संगठन क्षमता आणि जनतेचा उत्साह दिसून येतो.
‘योगांध्र २०२५’ हा कार्यक्रम भारताच्या योग चळवळीत एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. मोदी ते नायडू, सर्वांनी जनतेचा उत्साह आणि योगदानाचे केले कौतुक. आंध्र प्रदेश आता योग चळवळीचा नवा केंद्रबिंदू बनल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
