भारतीय क्रिकेटचा ‘हिटमॅन’ म्हणून जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या रोहित शर्मा यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, २३ जून हा दिवस रोहितसाठी अधिक खास ठरला. याच दिवशी २००७ मध्ये त्याने आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी त्याच तारखेला देशाच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्याचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना रोहितच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. राष्ट्रपती भवनातील हा सोहळा क्रिकेटप्रेमींसाठीही भावनिक क्षण ठरला. सोशल मीडियावर या सोहळ्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून चाहत्यांसह माजी आणि विद्यमान क्रिकेटपटूंनी रोहितवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
हे ही वाचा:
नार्वेकरांनी शोकप्रस्तावाच्या कागदातून भेळ खाल्ली होती का?
भारत-चीन संबंधांमध्ये मूलभूत हितांचा आदर आवश्यक
अमेरिकन गॅसवर भारताचा मोठा भरोसा!
आशाताईंचा शोक प्रस्ताव : राहुल नार्वेकर म्हणाले, दीनदयाल मंगेशकर, दुर्दमय इच्छाशक्ती
गेल्या जवळपास दोन दशकांपासून रोहित शर्मा भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ राहिला आहे. आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. एकदिवसीय सामन्यांमधील २६४ धावांची त्याची विश्वविक्रमी खेळी आजही अभेद्य मानली जाते. फलंदाज म्हणूनच नव्हे तर कर्णधार म्हणूनही रोहितने भारतीय संघाला नवी उंची गाठून दिली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवले.
पद्मश्री सन्मान स्वीकारल्यानंतर रोहितने हा क्षण आपल्या आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद असल्याचे सांगितले. देशासाठी खेळणे आणि भारताला विजय मिळवून देणे हेच आपले सर्वात मोठे ध्येय असल्याचे त्याने नमूद केले. एका तरुण क्रिकेटपटूपासून जागतिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या दिवसाच पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने हा क्षण रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेटसाठी कायम स्मरणात राहणारा ठरला आहे.







