मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने आयपीएलच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध एलिमिनेटर सामन्यात खेळताना रोहितने आपल्या दमदार ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर आयपीएलमध्ये सात हजार धावा पूर्ण केल्या. हा पराक्रम करणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा फलंदाज ठरला आहे.
मुंबई इंडियन्ससाठी खेळताना रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत ५० चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. या खेळी दरम्यान, जेव्हा त्याने ४३वी धाव घेतली, तेव्हा त्याने आयपीएलमधील ७००० धावा पूर्ण केल्या. रोहितने हा विक्रम २७१व्या सामन्याच्या २६६व्या डावात साधला.
या सामन्यातील चार षटकारांसह रोहितच्या खात्यात आता एकूण ३०२ षटकार जमा झाले असून, तो आयपीएलमध्ये ३०० किंवा अधिक षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. संपूर्ण आयपीएल इतिहासात केवळ क्रिस गेल (३५७ षटकार) हेच रोहितच्या पुढे आहेत.
रोहित शर्माने आपला आयपीएल प्रवास २००८ साली डेक्कन चार्जर्सकडून सुरू केला होता. त्यानंतर २०११ पासून तो मुंबई इंडियन्ससोबत आहे. आतापर्यंत खेळलेल्या २७१ सामन्यांमध्ये ७०३८ धावा, २ शतकं आणि ४७ अर्धशतकं त्याच्या खात्यात जमा आहेत.
एक यशस्वी फलंदाज असण्यासोबतच रोहित शर्मा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.
दुसरीकडे, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणजे विराट कोहली. त्याने २००८ पासून आरसीबीकडून खेळताना २६६ डावांत ८६१८ धावा, ८ शतकं आणि ६३ अर्धशतकं झळकावली आहेत.
