ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर याला सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सध्या उपचारांसाठी त्याला आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
श्रेयस अय्यरने बॅकवर्ड पॉइंटवरून धावताना अॅलेक्स कॅरीला बाद करण्यासाठी एक जबरदस्त झेल घेतला, पण तो झेलताना त्याच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली. ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर लगेचच त्याला तीव्र अस्वस्थता जाणवू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबद्दल एक निवेदनही प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की त्याच्या प्लीहाला (spleen) दुखापत झाली आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम श्रेयस याच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
“२५ ऑक्टोबर २०२५ रोजी सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगडीच्या खालच्या भागात दुखापत झाली. त्याला अधिक तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. स्कॅनमध्ये प्लीहाला जखम झाल्याचे दिसून आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तो वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहे आणि तो बरा होत आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम, सिडनी आणि भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करून, त्याच्या दुखापतीच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय टीम डॉक्टर श्रेयससोबत सिडनीमध्ये राहून त्याच्या दैनंदिन प्रगतीचे मूल्यांकन करतील,” असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा..
‘वध २’ चित्रपट पुढील वर्षी ६ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित
झारखंड : ईसाई धर्म सोडून ८ जणांची ‘घरवापसी’
‘मोंथा’मुळे आंध्र प्रदेश, ओडिशाला रेड अलर्ट
आसाम हा बांगलादेशचा भाग असल्याचा नकाशा!
दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बरगडीच्या दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानंतर अय्यर याला सध्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) वैद्यकीय मदत मिळत आहे. रक्तस्त्रावामुळे झालेला संसर्गाचा प्रसार रोखणे आवश्यक असल्याने, बरे झाल्यावर श्रेयसला दोन ते सात दिवस निरीक्षणाखाली ठेवतील, अशी माहिती समोर आली आहे.







