भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याने मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकांतने जपानच्या युशी तनाकावर सरळ गेममध्ये विजय मिळवत तब्बल सहा वर्षांनंतर बीडब्ल्यूएफ विश्व टूरच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
३२ वर्षीय श्रीकांतने आपल्या जुन्या शैलीत खेळ करत तनाकाचा २१-१८, २४-२२ असा पराभव केला. नेटवरील चपळ खेळ आणि अचूक आक्रमक फटकेबाजी याच्या जोरावर त्याने सामना आपल्या बाजूने वळवला. श्रीकांतचा अंतिम फेरीतील हा पहिला प्रवेश २०१९ इंडिया ओपननंतर आहे, तर त्याने शेवटचा बीडब्ल्यूएफ टायटल २०१७ मध्ये जिंकला होता.
पूर्वी जगातील क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला श्रीकांत गेल्या काही वर्षांमध्ये दुखापती आणि खराब फॉर्ममुळे ६५व्या स्थानावर घसरला होता. मात्र या स्पर्धेत त्याने दमदार पुनरागमन करत आपल्या क्षमतेची पुन्हा एकदा झलक दाखवली आहे.
या विजयानंतर आपल्या भावना व्यक्त करताना श्रीकांत म्हणाला, “मी खूप आनंदी आहे. सध्या शारीरिकदृष्ट्या चांगलं वाटतंय. यंदा काहीच ठरवलेलं नव्हतं, फक्त फिट राहण्यावर आणि नियमित सरावावर लक्ष केंद्रित केलं. आणि यंदा सगळं काही सुरळीत घडतंय.”
श्रीकांत रविवारी अंतिम सामन्यात चीनच्या ली शि फेंग विरुद्ध खेळणार आहे. आतापर्यंतच्या चार लढतींपैकी फेंगने तीन वेळा विजय मिळवला आहे, त्यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे.
