मध्य प्रदेशनंतर आता विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट गोव्यातही करमुक्त करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त बुधवारी (१९ फेब्रुवारी) संध्याकाळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे ही घोषणा केली. यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट त्यांच्या राज्यात करमुक्त केला होता. दरम्यान, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ चित्रपटाची देशभरात चर्चा आहे. अवघ्या तीन दिवसात १०० कोटींचा आकडा पार परत २०० कोटींचा आकडाही पार केला आहे.
‘छावा’ चित्रपट करमुक्त करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विटरवर लिहिले की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट गोव्यात करमुक्त केला जाईल.’ ते पुढे म्हणाले, हा चित्रपट संभाजी महाराजांच्या शौर्य आणि धैर्याचे चित्रण करतो, ज्यांनी ‘देव, देश आणि धर्म’ साठी मुघल आणि पोर्तुगीजांविरुद्ध लढा दिला.
हे ही वाचा :
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी धोक्यात? न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा
बीरभूम बॉम्बस्फोट : टीएमसी नेता बबलू मोंडलला १० वर्षांची शिक्षा
अमेरिकेतून हद्दपार झालेल्यांच्या यादीत पंजाबचा माणूस, अद्याप परतलेला नाही; कुटुंबाशी संपर्क नाही!
केजरीवाल यांची जिथे सुरुवात झाली तिथेच भाजप मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी घेतली शपथ
महाराष्ट्रातही चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी केली जात होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की, हा सिनेमा टॅक्स फ्री करा. पण महाराष्ट्रातील जनतेला सांगायचे आहे की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा ते करमणूक कर माफ करतात. महाराष्ट्राने २०१७ सालीच निर्णय घेतला आणि करमणूक कर हा नेहमीकरिता रद्द केला आहे. राज्यात करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी करच आपल्याकडे नाही,”.
या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता किंवा छत्रपती शंभू राजेंचा इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी अधिक काय चांगलं करता येईल ते नक्कीच करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. दरम्यान, सकाळच्या आकडेवारीनुसार ‘छावा’ चित्रपटाने आतापर्यंत २०२ कोटींची कमाई केली आहे.