मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटताना दिसले. विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील स्पष केले की, महाराष्ट्राची भाषा मराठीच, राज्यातील प्रत्येकाने मराठी शिकेल पाहिजे, बोलले पाहिजे. या नव्या वादादरम्यान, भय्याजी जोशी यांचे वक्तव्य समोर आले आहे. माझ्या विधानामुळे गैरसमज झाला असून मुंबईची भाषा मराठीच, यात दुमत नसल्याचे भय्याजी जोशी यांनी म्हटले आहे.
एएनआयशी संवाद साधताना भय्याजी जोशी म्हणाले, माझ्या एका विधानामुळे गैरसमज झाला असे वाटते. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचा भाग आहे. त्यामुळे मुंबईची भाषा मराठीच, यामध्ये कोणतेही दुमत नाही. भारताची एक विशेषता आहे कि इथे विविध भाषा बोलणारे लोक सुद्धा परस्परांना घेवून चालतात. त्याच्यामुळे कोठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही. जगासमोर आदर्श म्हणून हे एक उदाहरण आहे.
ते पुढे म्हणाले, मुंबईत बहुभाषिक लोक आहेत. मला असे वाटते कि हे सगळे सहअस्तित्वाने परस्परांवरती स्नेहसंबंध ठेवून मुंबईचे जीवन चालतंय. म्हणून स्वाभाविकपणे सर्वांची अपेक्षा राहते, ती म्हणजे बाहेरून येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी, त्याचे अध्ययन करावे, ती शिकावी. मराठी भाषा सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध अशी भाषा आहे. ती अनेकांनी अभ्यासावी अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे, असे भय्याजी जोशी म्हणाले. यावरून राज्यात सुरु असलेल्या राजकारणावर ते म्हणाले, मी काही बोलू इच्छित नाही कारण माझा तो काही विषय नाही.