मी गेल्या दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खातेवाटप करुन, बंगले वाटप करुन, ऑफिस वाटप करुन ‘संगीत मानापमान’ला आलोय. आमच्याकडे मानापमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निमित्त होतं, संगीत मानापमान या नाटकावर आधारित संगीत मानापमान या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगचे. हा चित्रपट नव्या वर्षात १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मुंबईत हा कार्यक्रम पार पडला.
गेली ११३ वर्षे सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता संगीत मानापमान या संगीत नाटकामध्ये आहे. ते नाटक आज रुपेरी पडद्यावर नव्या स्वरुपात पाहायला मिळतंय”, असे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “सुबोध भावे यांनी बालगंधर्व साकारला, भामिनीही साकारली, आता धैर्यधरही ते साकारत आहेत. हा देखील एक योगायोग आहे. आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं. मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं”. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकला. “मला अतिशय आनंद आहे की, या क्षणांचा साक्षी मी होऊ शकलो, असेही फडणवीस म्हणाले.
‘संगीत मानापमान’ हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक. याच अभिजात नाटकावरून प्रेरित असलेल्या ‘संगीत मानापमान’ या चित्रपटातही १८ प्रतिभावंत गायकांनी गायलेल्या १४ गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
‘सोन्याच्या भावापेक्षा जास्त दरात नाटकाची तिकीटे विकली गेली’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटतं की, खरं म्हणजे संगीत मानापमानचा ११३ वर्षांचा जो इतिहास आहे, त्याबाबत लोकांमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या दंतकथा आहेत. लोकं देखील सांगतात की, सोन्याचा जो भाव होता त्यापेक्षा जास्त दरात त्या नाटकाची तिकीटे विकली गेली. किंवा अगदी स्वातंत्र्याच्या लढ्यातही ज्यावेळी पैसा जमा करायचा होता त्यावेळी याच संगीत मानापमानाचे अनेक प्रयोग करण्यात आले. त्यामुळे त्याचा एक मोठा इतिहास आहे”.
हे ही वाचा:
मुंबईतून ६ घुसखोर बांगलादेशीना अटक, निवडणुकीत झाले मतदान!
आईला धडक देणाऱ्या कार चालकाची मुलांनी केली हत्या
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून आप सरकारच्या विरोधात ‘आरोप पत्र’ जारी
राहुल गांधी म्हणतात, सूर्यवंशी यांची हत्या दलित म्हणून…भातखळकर म्हणाले, ही तर गिधाडे!
प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाण्याची विनंती केली. यावेळी अभिनेता सुबोध भावे यांनी त्यांच्या हातात माईकही दिला. मात्र, माईक हातात घेतल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो की मी शब्दांत शूर आहे, पण सुरात असूर आहे. लोकांचा गैरसमज होतो. पण माझी बायको गाते, मला गाता येत नाही.” देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल भाष्य केल्यावर सुबोध भावे यांनी त्यांना फक्त गणपती बाप्पा मोरया बोलण्याची विनंती केली.