ईशान्येकडील भागात काही दिवसांपासून सुरू असलेल्या अविरत पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत किमान २५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी (१ जून) दिली. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पूर परिस्थिती लक्षात घेता अनेक भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने याबाबत अलर्ट जारी केला आहे. अशाप्रकारे, पावसानंतर अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण ईशान्येकडील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सततच्या मुसळधार पावसामुळे आसाममध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे १७ जिल्हे पाण्याखाली गेले आहेत आणि ७८,००० हून अधिक लोकांवर याचा परिणाम झाला आहे. गेल्या २४ तासांत मिझोरम, त्रिपुरा आणि मेघालयात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे हे मृत्यू झाले आहेत.
मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे मुख्य रस्ता बंद झाल्याने उत्तर सिक्कीमच्या विविध भागात सुमारे १,५०० पर्यटक अडकले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला मंगन जिल्ह्यात ११ पर्यटकांसह एक वाहन तिस्ता नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला, दोन जण जखमी झाले आणि आठ जण बेपत्ता झाले.
हे ही वाचा :
चौथ्या आर्थिक तिमाहीवर ‘महाकुंभ कृपा’?
बलुच लढवय्यांचा पाकिस्तानमधील सूरब शहरावर ताबा?
ठाकरेंची हिरवी सेना, राहुल गांधी किंवा आझमी असो, अनधिकृत मस्जिद-भोंगे खाली येणारच!
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री महिला; पण अत्याचार महिलांवर सर्वाधिक
दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत या प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा इशारा दिला आहे. आसामच्या काही भागांसाठी लाल आणि नारिंगी अलर्ट जारी केले आहेत तर ईशान्येकडील उर्वरित भागांसाठी नारिंगी आणि पिवळा अलर्ट जारी केला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाकडून बचावकार्य सुरु आहे. अरुणाचल प्रदेशमध्येही मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग नुकसानीचे मूल्यांकन करत आहे आणि बाधित कुटुंबांना त्वरित मदत पुरवत आहे.
