छत्तीसगडमध्ये माओवादी प्रभाव पूर्णतः नष्ट करण्याच्या उद्दिष्टासाठी केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंतची अंतिम वेळ ठरवली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे २२ व २३ जून दरम्यान दोन दिवसीय दौऱ्यावर छत्तीसगडमध्ये असतील. गृहमंत्री शाह यांच्या उपस्थितीत नवा रायपूर येथे एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे, ज्यामध्ये माओवादी हिंसाचारविरोधातील केंद्राच्या मोहिमेचा आढावा घेतला जाईल. या बैठकीत २०२६ पर्यंत माओवादी प्रभाव संपवण्यासाठीची रणनिती केंद्र आणि राज्य यंत्रणांमध्ये समन्वयाने कशी राबवावी, यावर चर्चा होईल.
राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठाचा पाया
गृहमंत्री अमित शाह नवा रायपूरमध्ये प्रस्तावित ‘राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ’ (NFSU) च्या जागेचे भूमिपूजन करतील. एकूण ४० एकर जमीन राज्य सरकारकडून दिली गेली आहे. ३५० ते ४०० कोटी रुपयांचा खर्च होणार असून, याला पूर्ण निधी केंद्र सरकार देणार आहे. यासोबतच, राज्य सरकारच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र ६ एकर जागाही आरक्षित करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘योगांध्र’च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवर पंतप्रधान मोदी खुश
पाकिस्तानकडून अमेरिकेच्या हवाई हल्ल्यावर जोरदार टीका
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर डागली ३० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे
अमेरिकेने केला इराणवर हल्ला; तीन आण्विक केंद्रांना केले लक्ष्य
सुरक्षा जवानांशी संवाद
अमित शाह सुरक्षा दलांच्या एका छावणीत जाऊन जोखिमग्रस्त भागांमध्ये कार्यरत जवानांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या अडचणी, गरजा आणि अनुभव ऐकून घेतले जातील.
नक्सलविरोधी मोहिमेतील यश
गेल्या काही महिन्यांतील ऑपरेशन्समध्ये केंद्र सरकारला मोठे यश मिळाले आहे. माओवादी केंद्रीय समितीचे ४५ पैकी ३२ सदस्य विविध चकमकींत मारले गेले आहेत. उर्वरित प्रमुख नेत्यांचा शोध आणि कारवाई सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. राज्याचे गृह मंत्री विजय शर्मा यांनी सांगितले की, या दौऱ्यात अमित शाह दोन महत्त्वाच्या पायाभरणी समारंभांना उपस्थित राहणार असून, त्यातून राज्याच्या तपास यंत्रणांना आणि सुरक्षेला चालना मिळणार आहे.
