दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आलेली असून निवडणुकीच्या अगोदर, दिल्लीतील बेकायदेशीर स्थलांतरितांवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयु) जारी केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, बांगलादेश आणि म्यानमारमधील स्थलांतरामुळे दिल्ली- एनसीआरची सामाजिक- राजकीय आणि आर्थिक रचना बदलली आहे. मुस्लिम लोकसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
जेएनयुच्या अहवालात बेकायदेशीर स्थायिकांच्या अशा वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या लोकसंख्येचे केवळ परिवर्तनच झाले नाही तर अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे, संसाधनांवर ताण आला असून गुन्हेगारी नेटवर्कला बळकटी मिळाली आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना मतदार नोंदणीच्या सुविधेसह दिलेले राजकीय संरक्षण याचाही दावा या अहवालात करण्यात आला आहे. ‘एएनआय’ने यासदंर्भात वृत्त दिले आहे.
दिल्लीतील बेकायदेशीर स्थालांतरित- सामाजिक- आर्थिक आणि राजकीय परिणामांचे विश्लेषण या शीर्षकाच्या ११४ पानांच्या अहवालात म्हणण्यात आले आहे की, बेकायदेशीर स्थलांतरामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे, कारण स्थलांतरित वस्त्यांमध्ये जास्त गर्दी आणि अस्वच्छ राहणीमान असून हेच संसर्गजन्य रोगांच्या प्रसारास कारणीभूत ठरते. नोंद नसलेल्या स्थलांतरितांची उपस्थिती ही आपत्ती प्रतिसाद आणि संकट व्यवस्थापनाच्या कार्यात अधिक गुंतागुंत करते, कारण या लोकसंख्येला आपत्कालीन परिस्थितीत अधिकृत मदत प्रयत्नांपासून वगळले जाते, असेही अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा..
‘राक्षेला पराभूत ठरविणाऱ्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत!’
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचा निवृत्त जवान हुतात्मा
शिर्डी हादरली! साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, दोघांचा मृत्यू!
उद्योगपती धनंजय दातार म्हणतात, विकासाभिमुख अर्थसंकल्प
भारत- बांग्लादेश सीमा हे अवैध स्थलांतर व्यवस्थापित करण्यासाठी एक मोठे आव्हान आहे, अपुऱ्या सीमा नियंत्रणामुळे स्थलांतरितांचा सतत ओघ सुरू असतो. भारतात सर्वसमावेशक इमिग्रेशन धोरण नसल्यामुळे बेकायदेशीर स्थलांतराची मूळ कारणे शोधणे आणि प्रभावी उपाय अंमलात आणणे कठीण झाले आहे, असे जेएनयुच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बांगलादेश आणि म्यानमारमधील स्थलांतरितांना अनेकदा स्थानिक लोकांकडून भेदभाव आणि शत्रुत्वाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे दिल्लीच्या सामाजिक गटात त्यांचे एकत्रीकरण आणखी गुंतागुंतीचे होते, ज्यामुळे उच्च पातळीवरील सामाजिक तणाव निर्माण होतो, असेही अहवालात म्हटले आहे. बेकायदेशीर इमिग्रेशनचे भू- राजकीय परिणाम आहेत, ज्यामुळे बांगलादेश आणि म्यानमार सारख्या शेजारील देशांशी भारताच्या संबंधांवर परिणाम होतो हे देखील यात अधोरेखित करण्यात आले आहे. सीमापार स्थलांतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहयोगी प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्थलांतरामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही झाला आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारी वृत्तीला चालना मिळाली आहे, असे अहवालात म्हटले आहे.