भारतानं चार दशकांनंतर मानवी अंतराळ उड्डाणात पुनरागमन केलं. बुधवारी (जून २५, २०२५) शुभांशु शुक्ला खाजगी स्पेस-एक्स (SpaceX)मोहिमेद्वारे कक्षेत गेले. ऍक्सिओम स्पेस (Axiom Space) या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेली एएक्स-४ (Ax-4) ही उड्डाणमोहीम या महिन्यात तीन वेळा पुढे ढकलण्यात आली — प्रथम रॉकेट इंधन गळतीमुळे, त्यानंतर दोनदा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील हवेची गळती आढळल्यामुळे. हे प्रक्षेपण फ्लोरिडा येथील अवकाश केंद्रातून सकाळी १०:३१ (GST) वाजता झाले. या मोहिमेत एएक्स-४ चे कमांडर आणि अनुभवी नासाचे (NASA) अंतराळवीर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोस्झ उझ्नान्स्की-व्हिस्निएव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचा देखील समावेश आहे. स्पेस-एक्स च्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी साधारणतः प्रक्षेपणानंतर २८ तासांनी संलग्न होणार आहे.
इतिहासात नोंदवला गेलेला प्रवास
भारतीय हवाई दलातील फायटर पायलट आणि भारताच्या आगामी ‘गगनयान’ मोहिमेसाठी इस्रोने निवडलेल्या चार अंतराळवीरांपैकी एक असलेले शुभांशु शुक्ला हे १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत अंतराळयानातून केलेल्या उड्डाणानंतर अंतराळात गेलेले पहिले भारतीय ठरले आहेत. शुक्लांची ही अंतराळ यात्रा भारतासाठी विशेष महत्त्वाची आहे, कारण १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत रशियाच्या सोयुझ (Soyuz) अंतराळयानातून ऐतिहासिक प्रवास केल्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी भारत पुन्हा एकदा मानवी अंतराळ मोहिमेत आपले स्थान निर्माण करत आहे. योग, विज्ञान आणि सांस्कृतिक प्रतीके घेऊन शुभांशू भारताचे प्रतिनिधित्व करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन भारताने अंतराळ क्षेत्रात भरीव पावले टाकली आहेत. ‘गगनयान’ योजनेपासून ते २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याच्या आणि ‘भारतीय अंतरिक्ष स्थानक’ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांपर्यंत केंद्र सरकारने स्पष्ट दिशा ठरवली आहे. ही केवळ तांत्रिक प्रगती नाही, तर एक दीर्घकालीन राष्ट्रीय दृष्टिकोन आहे. इस्रोचे (ISRO) यश हे केवळ वैज्ञानिक प्राविण्याचे नाही, तर एका शक्तिशाली राजकीय इच्छाशक्तीचेही फलित आहे
१९८४ मध्ये स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांनी अंतराळात झेप घेतली, तेव्हा “भारत कसा दिसतो?” या प्रश्नाला दिलेलं त्यांचं उत्तर — “सारे जहाँ से अच्छा…” — हे केवळ भावनिक उद्गार नव्हते, तर भारताच्या अंतराळ स्वप्नांची पहिली ठळक घोषणा होती. त्यानंतर जवळपास चार दशके उलटल्यानंतर, २०२५ मध्ये ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची प्रस्तावित आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहीम भारताला पुन्हा एकदा मानव अंतराळयात्रेच्या निर्णायक टप्प्यावर घेऊन येते.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील “आक्सियम मिशन-४” (Ax-4) मोहिमेत ग्रुप कॅप्टन शुभांशु हे मुख्य पायलटच्या भूमिकेत सहभागी होणार असून, त्यांनी केवळ एक ‘प्रेक्षक’ न राहता अवकाश यानाचे ऑपरेशन्स, यंत्रणांची तपासणी आणि वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सक्रीय सहभाग घेणार आहेत. विशेष म्हणजे, हे प्रयोग ‘गगनयान’ प्रकल्पासाठी थेट उपयोगी ठरणारे आहेत.
या मोहिमेचे नेतृत्व माजी नासा अंतराळवीर पेगी व्हिटसन करतील. इतर सदस्यांमध्ये पोलंडचे स्लावॉस उझ्नान्स्की-विस्निएव्हस्की आणि हंगेरीचे तिबोर कापू यांचा समावेश आहे. हे सर्वजण फ्लोरिडामधून स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानातून प्रक्षेपित केले जातील आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १४ दिवसांपर्यंत वैज्ञानिक संशोधन व जनजागृती कार्यक्रम राबवतील.
ग्रुप कॅप्टन प्रसांत बालकृष्णन नायर यांची ग्रुप कॅप्टन शुक्लांचे ‘बॅकअप’ म्हणून निवड करण्यात आली आहे. ही मोहीम इस्रो, नासा आणि खाजगी अंतराळ संस्थांमधील वाढत्या सहकार्याचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या मोहिमेत ग्रुप कॅप्टन शुभांशु सात शास्त्रीय प्रयोग करणार आहेत. अशा प्रयोगांचे सराव गगनयानच्या आरोग्यविषयक अभ्यासांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या मोहीमेमुळे इस्रोला एक प्रायोगिक आणि वास्तविक अनुभव मिळेल; तोही केवळ यान चालवण्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण मिशन प्रोफाइल, इमर्जन्सी रिस्पॉन्स, सूक्ष्म गुरुत्व वातावरणाशी जुळवून घेणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य, या साऱ्यांची भरपूर माहिती त्यातून मिळणार आहे.
अंतराळात भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व
या मिशनमध्ये ग्रुप कॅप्टन शुभांशु आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतील. ते योगाभ्यास करतील, हे ‘सॉफ्ट पॉवर’चे अंतराळीय स्वरूप असून, भारताचा सांस्कृतिक आत्मविश्वास जागतिक व्यासपीठावर मांडण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे.
गगनयानसाठी ‘स्पेस-रिहर्सल‘
या मोहिमेद्वारे भारताला एक प्रकारची ‘स्पेस ड्रिल’ मिळणार आहे – प्रक्षेपण प्रोटोकॉल, मायक्रोग्रॅव्हिटीशी जुळवून घेणे, आपत्कालीन तयारी, आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यासारख्या अनेक घटकांचा प्रत्यक्ष अनुभव ग्रुप कॅप्टन शुभांशु आणि भारतीय वैज्ञानिक गटाला मिळणार आहे. यामुळे गगनयानसाठी लागणाऱ्या प्रशिक्षण प्रक्रियेत ठोस सुधारणा करता येणार आहेत.
भारताची अंतराळ यात्रा आता नव्या पर्वात प्रवेश करत आहे. केवळ उपग्रह प्रक्षेपणापुरती मर्यादित न राहता, भारत आता दीर्घकालीन मानवयुक्त मोहिमा, चंद्रावर उतरण्याचे उद्दिष्ट, शुक्र आणि मंगळावर संशोधन, तसेच स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेने ठोस पावले टाकत आहे. या सर्व योजनेचे केंद्रबिंदू म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेली स्पेस व्हिजन २०४७ – एक अशी दूरदृष्टी जी भारताला जागतिक अंतराळ शक्ती म्हणून उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवते.
गगनयान: भारताची अंतराळातली मानवयुक्त झेप
इस्रोच्या सर्वात महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक प्रकल्पांपैकी एक म्हणजे गगनयान — भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम. ही मोहीम भारताला रशिया, अमेरिका आणि चीन यांच्या पंक्तीत उभी करणार आहे, म्हणजेच भारतही आता स्वतःच्या तंत्रज्ञानावर आधारित अंतराळात मानव पाठवणारा जगातील चौथा देश ठरणार आहे.
गगनयान म्हणजे नेमकं काय?
गगनयान ही एक स्वदेशी मानवयुक्त मोहीम आहे ज्यात तीन भारतीय अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत ४०० कि. मी. उंचीवर पाठवले जाणार आहेत. ही मोहीम साधारणतः ३ ते ७ दिवस अंतराळात राहील आणि नंतर हे अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परततील.
या प्रकल्पासाठी एलव्हीएम-३ हे शक्तिशाली प्रक्षेपण यान वापरण्यात येणार आहे. अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी विशेष क्रू मॉड्यूल तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये जीवनसंकलन प्रणाली, आग प्रतिबंधक यंत्रणा आणि पॅराशूटद्वारे समुद्रात सुरक्षितपणे उतरवण्याची सुविधा आहे. मानवमोहिमेपूर्वी ‘व्योममित्र’ नावाचा ह्यूमनॉइड रोबो चाचणीसाठी अंतराळात पाठवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले!
उद्धवजी, मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत!
‘दहशतवादाची केंद्रे आता सुरक्षित नाहीत’
व्हॉट्सऍप ग्रुुपमध्ये जोडला गेला, १ कोटी गमावून बसला!
गगनयान हा केवळ एक अंतराळप्रकल्प नसून भारताच्या भविष्यातील अंतराळ स्वप्नांचा पाया आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेमुळे भारताला चंद्रावर मानवी मोहीम, स्वतःचे स्पेस स्टेशन (BAS), आणि भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ संशोधनासाठी आवश्यक तंत्रज्ञानात प्रगती करता येईल. इस्रो, DRDO, HAL, आणि IIT यांसारख्या संस्थांनी एकत्रितपणे या प्रकल्पात योगदान दिले आहे. गगनयानमुळे भारत अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकत आहे.
भारतीय अंतरिक्ष स्थानक – पृथ्वीभोवती आणि चंद्राच्या दिशेने
भारताने २०३५ पर्यंत स्वतःचे स्वतंत्र अंतरिक्ष स्थानक स्थापन करण्याचा निश्चय केला आहे. या ‘भारतीय अंतरिक्ष स्थानक’ (Bharatiya Antariksh Station – BAS) चा पहिला मॉड्यूल २०२८ मध्ये प्रक्षेपित करण्याचे नियोजन आहे. सुमारे २० टन वजनाचे हे स्थानक पृथ्वीपासून ४०० किमी उंचीवर कमी कक्षेत फिरणार असून, भारतीय अंतराळवीरांना १५ ते २० दिवस राहण्यासाठी सुविधा देईल. येथे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात वैज्ञानिक प्रयोग करता येणार असून, दीर्घकालीन मानवी अंतराळ प्रवासासाठी आवश्यक तंत्रज्ञानांची चाचणीही घेता येणार आहे.
हे स्थानक केवळ विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, तर भारताच्या अंतराळ क्षेत्रातील स्वायत्ततेचे प्रतीक ठरणार आहे. यामुळे भारतास स्वतंत्र संशोधन प्लॅटफॉर्म मिळेल, जागतिक अंतराळ सहकार्यांत अधिक प्रभावी सहभाग घेता येईल आणि भविष्यातील चंद्र व मंगळ मोहिमांसाठी तांत्रिक कसोटी घेता येईल. हे स्थानक भारताच्या ‘गगनयान’ मोहिमेपासून सुरू झालेल्या मानवी अंतराळ संशोधन प्रवासाचा पुढचा टप्पा असेल.
स्पेस व्हिजन २०४७
भारताने ‘स्पेस व्हिजन २०४७’च्या माध्यमातून आपली अंतराळ धोरणं स्पष्ट व महत्त्वाकांक्षी स्वरूपात मांडली आहेत. ही संपूर्ण योजना भारताला एक जागतिक दर्जाचं ‘स्पेस सुपरपॉवर’ बनवण्याच्या दिशेने नेते. या दीर्घकालीन अंतराळ आराखड्यात आर्थिक आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनही स्पष्ट आहे. भारताने २०३३ पर्यंत जागतिक अंतराळ बाजारात ८ टक्के वाटा मिळवण्याचा निर्धार केला आहे, आणि आपल्या अंतराळ अर्थव्यवस्थेचं मूल्य $४४ अब्जांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्टही आहे. या आर्थिक वाढीसाठी खासगी क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे. स्टार्टअप्स, MSMEs आणि खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘IN-SPACe’ ही स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आली आहे. ही संस्था खासगी कंपन्यांना परवानग्या देणे, मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देण्याचं काम करते. हे धोरण भारतात संशोधन, रोजगार, गुंतवणूक आणि नवनवीन अंतराळ आधारित सेवांमध्ये लक्षणीय वाढ घडवून आणत आहे.
