इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक २०२५ स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली. दोन्ही संघांची अंतिम फेरीत नेपाळशी गाठ पडत आहे.
भारताचा अंतिम फेरीत प्रवेश होणार हे स्पष्टच होते. भारतीय खेळाडूंनी ते करूनही दाखवले. भारताच्या महिला संघाने आफ्रिकेवर ६६-१६ अशा फरकाने विजय मिळवला तर पुरुषांनी आफ्रिकेला ६०-४२ असे अवघ्या १८ गुणांनी हरवले.
महिलांमध्ये पहिल्या डावातच भारताने आपले इरादे दाखवून देत प्रतिस्पर्धी द. आफ्रिकेला सळो की पळो करून सोडले. या सामन्यात दोन्ही डावात भारताने प्रत्येकी ५ असे १० ड्रीम रन गुण मिळवत द. आफ्रिकेला धक्का दिला. आज पुन्हा एकदा प्रियांका इंगळेने (४ गुण) खो-खो विश्वचषकाचे आम्हीच दावेदार आहोत हे दाखवून दिले. पंजाबचे राज्यपाल महामहीम गुलाबचंद कटारिया यांनी हा सामना पाहण्याचा आनंद लुटला. भारताने हा सामना ६६-१६ (मध्यंतर ३३-१०) असा ५० गुणांनी जिकला.
हे ही वाचा:
… मग उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार!
सैफ हल्ला प्रकरणी मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून दोन संशयित ताब्यात
केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाज उपयोगी ठरावे
राजनाथ सिंह यांनी त्रिवेणीच्या संगमात घेतली डुबकी
भारतीय संघाने सामन्याला दमदार सुरुवात केली. चैत्रा बी. यांच्या अद्वितीय ड्रीम रन मुळे संघाने पहिल्याच टप्प्यात मजबूत पकड मिळवली. नाझिया बिबी आणि निर्मला भाटी यांना दक्षिण आफ्रिकेच्या बचावपटूंनी टिपल्यानंतरही चैत्राने एकटीने ५ गुण मिळवले. मात्र, अखेर सिनेतेंबा मोसिया यांनी तिला बाद केले. दुसऱ्या टर्नमध्ये रेश्मा राठोड यांनी आघाडी घेत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना बाद करण्यात मोठी कामगिरी केली.
तिसऱ्या टर्नमध्ये भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा ड्रीम रन साकारला. वैष्णवी पवार, नसरीन शेख, आणि भिलरदेवी यांनी सलग ५ मिनिटे मैदानावर उत्कृष्ट खेळ करत ५ गुण मिळवले. अंतिम टर्नमध्ये दक्षिण आफ्रिकन संघाच्या तुकड्यांनी चौथ्या टर्नमध्ये केवळ १ मिनिट ४५ सेकंद टिकाव धरला.
आता भारतीय महिला संघ रविवारी, १९ जानेवारी रोजी नेपाळविरुद्ध अंतिम लढतीसाठी मैदानात उतरणार आहे.
सामन्याचे पुरस्कार:
• सर्वोत्तम आक्रमक: सिनेतेंबा मोसिया (दक्षिण आफ्रिका)
• सर्वोत्तम संरक्षक : निर्मला भाटी (भारत)
• सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू: वैष्णवी पवार (भारत)
पुरुषांच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघांने दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले पण त्यांना आज दक्षिण आफ्रिकेने कडवी लढत दिली. हा सामना भारताने ६०-४२ असा १८ गुणांनी जिंकला.
आज मैदानात खो देण्यापासून ते खेळाडू बाद करण्यापर्यंत दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू सूर मारताना दिसले. खुंट मारताना काही वेळा भारतीय खेळाडूंना कळलेच नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून कळत होते. त्यांच्या खेळाडूंचा वेग वाखाणण्याजोगा होता. या वेगाच्या जोरावरच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी पहिल्या डावात २० तर दुसऱ्या डावात २२ गुण असे ४२ गुण मिळवत भारतीय संघाला कडवी लढत दिली. मध्यंतराला भारताकडे २८-२० अशी फक्त ८ गुणांचीच आघाडी होती.
या सामन्यात भारताच्या प्रतीक वाईकर (४ गुण), आदित्य गनपुले (१ मि. संरक्षण ६ गुण), मोहित, सचिन भार्गो, अनिकेत पोटे (४ गुण) , गौतम एम. के. (१.२९ मि. संरक्षण व १० गुण) व निखील बी. सुयश गरगटे (१.०६ मि. संरक्षण) यांनी विजयात महत्वाची कामगिरी करत विजय साकारला.
सर्वोत्कृष्ट खेळाडू :
सर्वोत्कृष्ट आक्रमक: बोंगानी म्ट्स्वेनी (दक्षिण आफ्रिका)
सर्वोत्कृष्ट बचावपटू: सचिन भार्गो (भारत)
सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू: गौतम एम.के. (भारत)