बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या काही दिवसांनंतर मुंबई पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री ठाण्यातील वाघबिळ परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईट वरून आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा बांगलादेशी नागरिक असून तो ६ महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोहम्मद शरीफुल इस्लाम शहिजाद (३३) असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. त्याने भारतात आल्यावर विजय दास असे नाव धारण करून पश्चिम बंगाल येथे राहणारा असल्याचे प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगितले होते.
पोलिसांना त्याच्याकडे मिळून आलेल्या कागदपत्रावरून त्याची खरी ओळख पटविण्यात आली असून तो बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले असल्याची माहिती परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त दिक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पोलिस पथकाकडून ठाण्यातील हिरानंदानी येथील मेट्रो बांधकाम साइटजवळील लेबर कॅम्प येथून हल्लेखोराला अटक करण्यात आली. हल्ल्यानंतर मोहम्मद शहिजाद हा आरोपी आपल्या काही सहकाऱ्यासोबत ठाण्यातील बांधकाम साईटवर लपून बसला होता. मुंबईत सहा महिन्यांपूर्वी घुसखोरी करून आलेला मोहम्मद शहिजाद या आरोपीने हाऊसकिपिंगचे काम करीत होता.
पोलिस सुत्राच्या म्हणण्यानुसार आरोपीने काही दिवस हाऊसकिपिंग स्टाफ सोबत सैफ अली खानच्या घरी काम केले होते. त्यामुळे त्याला सैफ अली खान च्या घरात प्रवेश करताना अडचण आली नसल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी उघड केले की अंधेरी पश्चिम स्थानकाबाहेर सापडलेल्या त्याच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ते आरोपीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले होते, हल्ल्यानंतर त्याचा मित्र त्याला मोटारसायकल वरून घेऊन गेला होता.
सीसीटीव्ही फुटेज मध्ये पोलिसांना आरोपीच्या मित्राचा मोटारसायकल क्रमांक मिळाला होता. पोलिसांनी गाडीचा माग काढला आणि त्याच्या मित्राच्या चौकशीत ते आरोपी पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले, त्याला कासारवडवली पोलिसांच्या मदतीने ठाणे येथून अटक करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याला अल्पावधीत पैसे कमवायचे होते. आरोपी मूळचा बांगलादेशचा असून तो मुंबईत वरळी कोळीवाड्याजवळ राहत होता. अटकेच्या भीतीने तो नुकताच ठाणे हिरानंदानी येथे स्थलांतरित झाला.
हे ही वाचा:
अजित पवार बीडचे पालकमंत्री, धनंजय मुंडेंचा पत्ता कट
… मग उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार!
तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य
राजनाथ सिंह यांनी त्रिवेणीच्या संगमात घेतली डुबकी
पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमजीत दहिया आणि डीसीपी झोन 09, दीक्षित गेडाम यांच्या देखरेखीखाली दया नायक यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथक-9 ने आरोपीचा शोध घेतला. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीने अटक टाळण्यासाठी कपडे बदलल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे, असे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.
संशयिताचा शोध घेण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो अभिनेत्याच्या घरी पोहोचण्यासाठी जिना वापरताना दिसला होता आणि या फुटेजमध्ये तो सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर पळून जाण्यासाठी त्याचा जिना वापरताना दिसला होता, असे सूत्रांनी सांगितले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “त्याला न्यायालयात हजर केले जाईल आणि पोलीस या प्रकरणात चौकशीसाठी त्याची पोलीस कोठडी मागण्यात येईल.