धनंजय मुंडे यांच्या पत्नी म्हणवल्या जाणाऱ्या करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी पोटगी द्यावी असे कोणतेही आदेश न्यायालयाने दिलेले नाहीत, असे स्पष्टीकरण मुंडे यांच्या वकिलांनी केले आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयात हा वाद सुरू होता. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयात झालेला युक्तिवाद तसेच न्यायालयाचा निकाल याबाबत धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंग यांनी संपूर्ण खुलासा केला आहे.
शार्दुल सिंग म्हणाले की, या प्रकरणाचा युक्तिवाद गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत झाला होता. ४ फेब्रुवारी रोजी हा अंतरिम निकाल आलेला आहे. करुणा शर्मा नावाच्या महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध याचिका केली होती. घरगुती मारहाण या अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. नियम असा आहे की, कुठलीही महिला कुठल्याही पुरुषाबरोबर राहिली असेल तर ती भविष्यात किंवा भूतकाळात आपल्या उदरनिर्वाहासाठी देखभालीच्या खर्चाबाबत याचिका दाखल करू शकते.
२०२२ मध्ये करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधामध्ये याचिका केली होती. त्यात त्यांचे म्हणणे होते की, घर व बँकेचे ईएमआय भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. मात्र यात कुठेही शारिरीक छळ केल्याचा आरोप लावलेला नाही. धनंजय मुंडे माझ्याबरोबर राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांनी मला पैसे द्यावे अशी ती याचिका होती. जोपर्यंत हा खटला संपत नाही, तोपर्यंत उदरनिर्वाहसाठी किती पैसे द्यावे यावरून युक्तिवाद झाला. या प्रकरणात कोर्टानं असं सांगितले, की करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये देण्यास हरकत नसावी. लिव्ह इन रिलेशनशिप मान्य केल्यानं हे आदेश देण्यात आले आहेत, त्याला आपण पोटगी म्हणू शकत नाही, असे वकील शार्दुल सिंग यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
मोरे महाराजांच्या मृत्यूचे ओझे कोणाच्या खांद्यावर?
मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढावू विमान मिराज कोसळले, वैमानिक सुरक्षित!
पतीला वाचवण्यासाठी पत्नीचे धाडसी पाऊल
करुणा शर्मा नव्हे आता करुणा मुंडे, धनंजय मुंडेंनी पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश!
शार्दुल सिंग म्हणतात की, करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत, असा कोणताही दर्जा न्यायालयाने दिलेला नाही. त्या पहिल्या पत्नी ऑन रेकॉर्ड कुठेच नाहीत, त्यांच्याबरोबर कधी लग्नही झालेलं नाही. हायकोर्टात जो खटला धनंजय मुंडे यांच्यावर दाखल केला होता त्या खटल्यासह इतर खटल्यात त्यांनी कुठेच असा दावा केलेला नाही. न्यायालयाने जी २५ पानांचा आदेश दिला आहे, त्यात कुठेही करुणा शर्मा यांचा उल्लेख पत्नी म्हणून केलेला नाही. तो जर वापरण्यात आला असेल तर तो दाखवून द्यावा.
अशा प्रकारचे स्पष्टीकरण गुणरत्न सदावर्ते यांनीही दिले आहे. आपण कायद्याचे अभ्यासक आणि विद्यार्थी असून यात कुठेही करुणा शर्मा यांना पोटगी दिलेली नाही मग मीडियातून तसे का दाखविण्यात येत आहे, असा सवाल सदावर्ते यांनी विचारला आहे.