उत्तर प्रदेशातील प्रयागराज भव्य दिव्य अशा महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभ मेळ्यात लाखोंच्या संख्येने देशभरातून आणि जगातील विविध देशांमधून लोक उपस्थिती लावत आहेत. महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी लोक दाखल होत असून या मेळ्यासाठी केलेल्या सोयीसुविधा आणि आयोजनाचे ते कौतुक देखील करत आहेत. अशातच महाकुंभ हा आता जागतिक पातळीवर चर्चेचा विषय बनला असताना पाकिस्तानमधूनही काही भाविक कुंभ मेळ्यात दाखल झाले आहेत.
पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील ६८ हिंदू भाविकांचा एक गट गुरुवारी प्रयागराज येथे पोहोचला आहे. त्यांनी संगमात स्नान केले असून प्रार्थना देखील केली आहे. या भाविकांसह आलेले महंत रामनाथ म्हणाले की, यापूर्वी ते सर्व हरिद्वारला गेले होते जिथे त्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या अस्थींचे विसर्जन करत पूजा केली. यानंतर, ते महाकुंभात आले आणि संगमात स्नान केले आणि त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली. सिंध प्रांतातून आलेले गोविंद राम मखीजा म्हणाले की, “गेल्या दोन- तीन महिन्यांपासून आम्ही महाकुंभाबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून आम्हाला येथे येण्याची इच्छा होती. या पवित्र जागेत येण्यापासून आम्ही स्वतःला रोखू शकलो नाही. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तानातून २५० लोक प्रयागराजला आले होते आणि त्यांनी गंगा नदीत डुबकी मारली. यावेळी, सिंधच्या सहा जिल्ह्यांमधून ६८ लोक आले आहेत. गोटकी, सुक्कुर, खैरपूर, शिकारपूर, कर्जकोट आणि जटाबल येथून लोक आले आहेत. त्यापैकी सुमारे ५० लोक पहिल्यांदाच महाकुंभात आले आहेत. ते पुढे असेही म्हणाले की, येथे येऊन खूप आनंदी आहे. इकडच्या अनुभवाचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. इथे आल्यानंतर आम्हाला सनातन धर्मात जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो.”
सिंध प्रांतातील गोटकी येथील ११ वी ची विद्यार्थिनी सुरभी म्हणाली की, ती पहिल्यांदाच भारतात आली आहे आणि पहिल्यांदाच कुंभमेळ्याला आली आहे. पहिल्यांदाच आपला धर्म सखोलपणे समजून घेण्याची संधी मिळत आहे. खूप छान वाटतंय. तर, त्यांच्यासोबत आलेल्या प्रियांका म्हणाल्या की, “मी पहिल्यांदाच भारतात आणि महाकुंभात आली आहे. येथील आपली संस्कृती पाहणे हा एक अतिशय दिव्य अनुभव आहे. मी एक गृहिणी आहे आणि भारतात येणे हे माझे सर्वात मोठे भाग्य आहे. आम्ही तिथे जन्मलो आणि मुस्लिमांमध्ये राहिलो. सिंध प्रांतात हिंदूंविरुद्ध माध्यमांमध्ये दाखवल्याप्रमाणे फारसा भेदभाव होत नाही. पण आम्हाला इथे आमची संस्कृती पाहण्याची संधी मिळत आहे.”
हे ही वाचा :
एलोन मस्कच्या DOGE टीममधील २२ वर्षीय आकाश बोब्बा कोण आहे?
मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढावू विमान मिराज कोसळले, वैमानिक सुरक्षित!
‘येशूच्या क्रोधाला घाबरा, देवांच्या मूर्ती तोडा’
सक्कर जिल्ह्यातील निरंजन चावला म्हणाले की, “मी भारत सरकारला व्हिसा देण्याची प्रक्रिया थोडी सोपी करण्याची विनंती करू इच्छितो. सध्या, व्हिसा मंजूर होण्यासाठी सहा महिने लागतात. तथापि, येथे आलेल्या गटाला सहजपणे व्हिसा देण्यात आला, ज्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभार मानतो. आता आखाड्यातील संत आणि ऋषींना भेटायला जाऊ आणि संपूर्ण मेळा पाहू.”