ऑपरेशन सिंदूर ग्लोबल आऊटरीच अंतर्गत विविध देशांच्या दौर्यावर गेलेल्या सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांपैकी, शिवसेना खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने यूएई दौऱ्यादरम्यान अबू धाबीतील जागतिक ख्याती असलेल्या बीएपीएस हिंदू मंदिराला भेट दिली. या शिष्टमंडळात भाजप खासदार बांसुरी स्वराज, मनन कुमार मिश्रा, एस.एस. अहलूवालिया; बीजेडीचे खासदार सस्मित पात्रा; आययूएमएलचे खासदार ई.टी. मोहम्मद बशीर आणि जपानमधील भारताचे माजी राजदूत सुजन चिनॉय हे सहभागी होते.
मंदिराची अद्वितीय वास्तुशैली, पवित्रता आणि अध्यात्मिक वातावरणाने संपूर्ण शिष्टमंडळ भारावून गेले. विशेषतः मंदिरातून दिला जाणारा जागतिक सौहार्दाचा संदेश सर्वांच्या अंत:करणाला स्पर्शून गेला. शिष्टमंडळाचे स्वागत भारताचे यूएईतील राजदूत संजय सुधीर आणि मंदिराचे चेअरमन अशोक कोटेचा यांनी अत्यंत आत्मीयतेने केले. या मंदिराच्या निर्माणासाठी बीएपीएस संस्थेच्या प्रयत्नांचे आणि भारत-यूएई नेतृत्वाच्या सहयोगाचे शिष्टमंडळाने मन:पूर्वक कौतुक केले. हे मंदिर शांती, ऐक्य आणि सामायिक मूल्यांचे शाश्वत प्रतीक आहे.
हेही वाचा..
नाभवर नियमित तेल लावल्याने काय फायदा ?
एम्सच्या डॉक्टरसह दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह
बीएपीएस हिंदू मंदिराने आपल्या अधिकृत एक्स (X) हँडलवरून शिष्टमंडळाच्या भेटीबाबत माहिती दिली. त्यांनी शिष्टमंडळाच्या भेटीच्या काही छायाचित्रांसह पोस्टमध्ये लिहिले, “ऑपरेशन सिंदूर ग्लोबल आऊटरीच अंतर्गत श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अबू धाबीतील बीएपीएस हिंदू मंदिराला भेट दिली व प्रार्थना केली. या शिष्टमंडळात बांसुरी स्वराज, मनन कुमार मिश्रा, एस.एस. अहलूवालिया, सस्मित पात्रा, ई.टी. मोहम्मद बशीर आणि सुजन चिनॉय सहभागी होते.
परंपरागत भारतीय वास्तुकलेचा आणि आधुनिक टिकाऊतेच्या तत्त्वांचा सुरेख संगम असलेले बीएपीएस हिंदू मंदिर हे अबू धाबीतील शांती, मैत्री आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. सर्व पार्श्वभूमीच्या लोकांसाठी खुले असलेले हे मंदिर भारत आणि यूएई यांच्यातील सांस्कृतिक मैत्रीचा मजबूत सेतू आहे, जो ऐक्य आणि करुणेला प्रेरणा देतो. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडला होता. या सोहळ्यात यूएईचे नेतृत्व, विविध समुदायांचे नेते आणि हजारो भक्तांनी सहभाग घेतला होता, ज्यातून एकता, सेवा आणि अध्यात्मिक प्रगतीचा एक वर्षाचा प्रवास साजरा करण्यात आला.
