प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानच्या सीमेवर हाय अलर्टच्या बातम्या दरवर्षी येत असतात. मात्र, यावेळी बांगलादेशच्या सीमेवरही सतर्कता वाढवण्यात आली आहे. बांगलादेशसोबतच्या तणावपूर्ण संबंधांमध्ये सीमा सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ‘ओपीएस अलर्ट’ मोहीम सुरू केली आहे. भारत-बांग्लादेश सीमेवर सुरक्षा दक्षता वाढवण्यासाठी ही १० दिवसांची मोहीम राबविण्यात येत आहे. बदलती परिस्थिती आणि सुरक्षेतील आव्हाने पाहता बीएसएफने हे पाऊल उचलले आहे.
बीएसएफने २२ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत ४,०९६ किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर ‘ओपीएस अलर्ट’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सीमेवरील चौक्यांवर सुरक्षा वाढवण्याबरोबरच गस्त आणि देखरेख वाढवण्यात येणार आहे. बीएसएफच्या अधिकृत निवेदनानुसार, या मोहिमेअंतर्गत प्रत्येक चौकी आणि परिसरात सुरक्षा उपक्रम अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.
हे ही वाचा :
मणिपूरमधून प्रतिबंधित कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीच्या सक्रीय सदस्यांना अटक
ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या निर्णयावर स्थगिती
दिल्लीत वेचून वेचून काढणार बांगलादेशी!
बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी), पूर्व कमांड, रवी गांधी यांनी दक्षिण बंगाल फ्रंटियरला भेट दिली आणि सुरक्षा सज्जतेचा आढावा घेतला. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना नदीकाठावर आणि कुंपण नसलेल्या भागात दक्षता वाढविण्याचे निर्देश दिले. या काळात बीएसएफचे जवान सखोल सुरक्षा सराव करतील आणि सीमेवर राहणाऱ्या नागरिकांशी सलोखा कार्यक्रमही आयोजित करतील.