भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, दूरपर्यंत या स्फोटाचे हादरे बसले. आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत शुक्रवार, २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान मोठा स्फोट झाला आहे. कंपनीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट झाला असून कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की, ज्या इमारतीत स्फोट झाला ती इमारत पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. तसेच आसपासच्या १०-१२ गावांना या स्फोटाचे हादरे बसले. सध्या या कंपनीचे अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या इमारतीत स्फोट झाला तेव्हा १४ कामगार कार्यरत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या कंपनीचे मुख्यद्वार सील करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी गेट जवळ गर्दी केली असून कंपनीत कामाला गेलेले नातलग सुखरूप आहेत की नाही याबाबत विचारणा केली जात आहे.
हे ही वाचा :
प्रजासत्ताक दिनी पाकिस्तासह बांगलादेश सीमेवरही हाय अलर्ट!
मणिपूरमधून प्रतिबंधित कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीच्या सक्रीय सदस्यांना अटक
ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या निर्णयावर स्थगिती
दिल्लीत वेचून वेचून काढणार बांगलादेशी!
यापूर्वी २०२४ च्या जानेवारी महिन्यात जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत भीषण स्फोट झाला होता. त्यात एक कर्मचारी ठार झाला होता. तर, या घटनेपूर्वी भंडारा शहरालगत असलेल्या सनफ्लॅग कंपनीतली स्फोट झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये तीन कर्मचारी भाजले होते.