माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली म्हणाला, टीम इंडियाकडे इतके प्रतिभावन खेळाडू आहेत की पुढील आठ वर्ष “जगभरातील संघांचा सामना करण्यासाठी” एक मजबूत संघ आहे. विराटने हे विधान रविवारी दुबईमध्ये न्यूझीलंडला चार विकेट्सनी पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर केले.
कोहली म्हणाला, “जेव्हा तुम्ही निवृत्त होता, तेव्हा तुम्हाला संघ अधिक चांगल्या स्थितीत सोडायचा असतो. मला वाटते की आमच्याकडे असा संघ आहे जो पुढील आठ वर्षांसाठी जगभरातील संघांचा सामना करण्यास तयार आहे. शुभमन गिलने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यर अप्रतिम खेळला आहे आणि त्याने अनेक सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे, के. एल. राहुलने सामने संपवले आहेत आणि हार्दिक पांड्याही फलंदाजीसह उत्तम खेळ दाखवत आहे.”
कोहली म्हणतो की चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजय काही प्रमाणात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर संघाला सावरण्यास मदत करेल. कोहली म्हणाले, “आम्हाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुनरागमन करायचे होते आणि एक मोठी स्पर्धा जिंकायची होती, आणि अखेरीस आम्ही ते करू शकलो, त्यामुळे हा एक अद्भुत अनुभव आहे.”
विजयानंतर गिलच्या शेजारी उभे राहून, कोहलीला विचारण्यात आले की जेव्हा तो या फॉरमॅटमधून निवृत्त होईल तेव्हा ड्रेसिंग रूम चांगल्या स्थितीत सोडण्याबाबत काय विचार आहेत? त्यावर तो म्हणाला, “आमच्या ड्रेसिंग रूममध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. ते आपला खेळ आणखी सुधारू इच्छितात आणि आम्ही (ज्येष्ठ खेळाडू) त्यांना मदत करण्यात तयार आहोत, आमचा अनुभव शेअर करत आहोत आणि हेच भारतीय संघाला अधिक बळकट बनवते.”
“हीच ती कारणे आहेत ज्यासाठी तुम्ही खेळता—चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी, दबावाखाली खेळण्यासाठी आणि जबाबदारी उचलण्यासाठी. संपूर्ण स्पर्धेदरम्यान प्रत्येक खेळाडूने कधी ना कधी पुढे येऊन जबाबदारी घेतली आणि प्रभावी प्रदर्शन केले. आम्ही एका अद्भुत संघाचा भाग आहोत, सराव सत्रांमध्ये घेतलेली मेहनत या विजयामध्ये परिवर्तित होताना पाहणे खरोखरच आनंददायी आहे.”
कोहलीने प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघाचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांची क्षमता पाहून तो “आश्चर्यचकित” झाला आहे. तो म्हणाला, “आम्ही नेहमीच आश्चर्यचकित होतो की त्यांनी मर्यादित खेळाडू असूनही गेल्या काही वर्षांत किती उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्यांची प्रतिभा किती उत्तम प्रकारे वापरली आहे. जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध मोठ्या सामन्यांमध्ये खेळतो, आम्हाला ठाऊक असते की ते निश्चित योजनेसह येतील. जागतिक क्रिकेटमध्ये कोणताही संघ त्यांच्या सारखा नियोजन अंमलात आणत नाही.”
हेही वाचा :
श्रीजेश, सविता, हरमनप्रीत यांचे हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कारांसाठी नामांकन
वानुअतु देशाकडून ललित मोदीला दणका; पासपोर्ट रद्द करण्याचा आदेश
हंपी बलात्कार प्रकरणात तिसऱ्या नराधमाला चेन्नईहून ठोकल्या बेड्या
“प्रत्येक क्षेत्ररक्षकाला माहित असते की गोलंदाज कोठे गोलंदाजी करेल, तुम्ही हे जाणू शकता, ते सर्व चेंडूला आक्रमकपणे खेळतात. त्यांना माहित असते की कोणता गोलंदाज प्रभावी ठरेल. त्यांना गेल्या काही स्पर्धांमध्ये सर्वात सातत्यपूर्ण संघ म्हणून मान्यता मिळाली आहे. याचे कारण म्हणजे ते त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या प्रतिभेचा पूर्ण वापर करतात.”
“ते जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांपैकी एक आहेत, त्यांना मोठे श्रेय जाते. ते वारंवार दाखवतात की ते का जगातील सर्वोच्च संघांपैकी एक आहेत. माझा चांगला मित्र (केन विल्यमसन) पराभूत होताना पाहणे, थोडे दु:खदायकही आहे.”