मुंबई पोलिसांनी मागील २४ तासांत १० बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे,काळाचौकी येथून ५ शिवाजी नगर गोवंडी येथून ४ तर साकिनाका पोलिसांनी एक बांगलादेशी घुसखोराना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशीकडे बोगस कागदपत्राच्या आधारे तयार करण्यात आलेले भारतीय पुरावे जप्त करण्यात आले आहे.
मोहम्मद सलाम सरदार उर्फ अबू सलाम, सोहाग सफीकुल सरदार उर्फ मोहम्मद सोहाग सफीकुल इस्लाम, मोहम्मद शमीम मुराद हसन अली उर्फ समीम मुल्ला, मोहम्मद अलामिन लतीफ मोरोल आणि आशुरा खातून असे काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पाच जणांची नावे आहेत.
हुसेन मोफिजल शेख,लिटोन मोफिजल शेख, अन्सार अली सरदार, सुलेमान रहीम शेख अशी शिवाजी नगर पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. आणि शाहिदा मुल्ला उर्फ माही चौधरीला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, अटक केलेल्या व्यक्तींनी पश्चिम बंगालमध्ये पोहोचण्यापूर्वी भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला आणि तेथून ते मुंबईत आले. ते शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. पोलिस आता त्यांच्या सीमा ओलांडण्यास आणि त्यानंतर मुंबईत राहण्यासाठी मदत करणाऱ्यांची चौकशी करत आहेत.
काळाचौकी पोलिसांना अशी माहिती मिळाली की आशुरा खातून ही बांगलादेशी महिला चिंचपोकली पूर्वेमध्ये बेकायदेशीरपणे राहत आहे आणि काम करत आहे. या माहितीच्या आधारे कारवाई करत, कालाचौकी पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
हे ही वाचा:
केजरीवाल या जन्मात तरी तिहारमधून बाहेर पडणार नाहीत!
पत्नीच्या जाचाला कंटाळून आग्रा येथील तंत्रज्ञाची आत्महत्या; मृत्युपूर्वी बनवला व्हिडीओ
तेलुगू भाषेतही आता ‘छावा’ची गर्जना!
चौकशीदरम्यान, आशुराने कायदेशीर कागदपत्रांशिवाय मुंबईत राहणारी बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले. तिने सांगितले की तिने मुलकी नदीमार्गे सीमा ओलांडली होती आणि तिच्याकडे कोणतेही वैध ओळखपत्र नव्हते. तिच्या कबुलीजबाबाच्या आधारे, पोलिसांनी आणखी चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली, ज्यांनी त्याच मार्गाने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता.
पोलिसांनी आता अटक केलेल्या व्यक्तींना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भारतात बेकायदेशीर प्रवेशासाठी जबाबदार असलेल्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान शिवाजी नगर पोलिसांनी लोटस जंक्शन येथून चौघांना अटक केली आहे, अटक करण्यात आलेले चौघे मागील १५ वर्षांपासून बेकायदेशीररित्या वास्तव्यास होते.
साकिनाका पोलिसांनी अटक केलेल्या शाहिदा मुल्ला उर्फ माही चौधरीला (२३) साकिनाका येथून अटक केली असून ती गोरेगाव लिंक रोड येथे एका सोसायटीत राहण्यास होती. शाहिदा मुल्ला ही दीड वर्षांपासून मुंबईत राहते, तीला बॉलिवूड मध्ये करियर करायचे होते त्यासाठी तिने स्वतःचे नाव बदलून माही चौधरी असे ठेवले, तसेच त्या नावाने भारतीय निवडुन ओळखपत्र ,पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे तयार केली होती.