आज अडीच वर्षांचा काळ जवळपास लोटला आहे, पण एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या इतिहासातून उद्धव ठाकरे बाहेर पडायला तयार नाहीत. लोकसभा, विधानसभा निवडणूक झाली तरी ते अजूनही तोच गद्दारीचा राग आळवत बसले आहेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कितीही गंगेत डुबकी मारली तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. एकनाथ शिंदे नुकतेच महाकुंभमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी पवित्र गंगास्नान केले. त्यावरून उद्धव ठाकरे यांना ही टीका करावीशी वाटली. मुळात उद्धव ठाकरे स्वतः मात्र या महाकुंभला गेले नाहीत. त्यावरून त्यांच्यावर टीका केली गेली. रामदास आठवले यांनी उद्धव आणि राहुल गांधी यांच्यावर हिंदूंनी बहिष्कार घालावा अशी मागणी केली. असे असले तरी या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्याची संधी उद्धव यांनी साधली.
पण आता याला काहीही अर्थ उरलेला नाही. किती काळ ही टीका उद्धव ठाकरे करणार आणि लोकांच्या टाळ्या मिळवणार?
आज उबाठा गटातून रोज काही लोक बाहेर पडत आहेत. पक्ष रिकामा होण्याची वेळ आली आहे पण उद्धव ठाकरे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. अगदी त्यांचे कोकणातील नेतेस भास्कर जाधव यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला. जे पक्ष सोडून जात आहेत त्यांना पक्षप्रमुखांनी रागावणे आणि त्यांना सोडून जायचे तर जा असे म्हणणे ठीक पण बाकी नेत्यांनी असे न करता जाणाऱ्या नेत्यांना थांबवले पाहिजे, समजावले पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यावरून पक्षाने मग बैठका घेत हा जाणारा प्रवाह रोखण्यासाठी काय करता येईल, यासाठी मंथन केले. मात्र तरीही अजून गद्दारीचा शिक्का लावण्याची सवय उद्धव यांनी सोडलेली नाही.
हे ही वाचा:
पत्नीच्या जाचाला कंटाळून आग्रा येथील तंत्रज्ञाची आत्महत्या; मृत्युपूर्वी बनवला व्हिडीओ
कंगना राणौत आणि जावेद अख्तर यांनी ५ वर्षांपासूनचा वाद अखेर मिटविला!
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची मोदी, बागेश्वर बाबांवर स्तुतीसुमने
तेलुगू भाषेतही आता ‘छावा’ची गर्जना!
उद्धव ठाकरे यांनी हे उद्गार काढल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्याला चोख उत्तर दिले. चिन्ह, पक्ष गहाण ठेवल्यामुळे शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले. ते पाप मी जाऊन गंगेत धुतले, असे शिंदे म्हणाले. पण असे आरोप प्रत्यारोप आता नवे राहिलेले नाहीत. त्यात लोकांनाही आता काही नावीन्य वाटेनासे झाले आहे. मुळात उद्धव ठाकरे यांनी जेव्हा पक्ष, चिन्ह याबाबत निवडणूक आयोग तसेच विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून प्रतिकूल निकाल लागल्यावर जनतेच्या न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली होती, ती संधी त्यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मिळाली. पण विधानसभा निवडणुकीत लोकांनी उबाठाचा सुपडा साफ केला. एकप्रकारे उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेले आरोप, चिखलफेक आणि गद्दारीचा शिक्का असल्याची टिप्पणी हे जनतेने आपल्या निकालाने पुसून टाकले आहे. आता जनतेच्या न्यायालयात जो निकाल लागला आहे त्याचा आदर करण्याची आवश्यकता आहे. पण अजूनही उद्धव ठाकरे ते स्वीकारायला तयार नाहीत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आरसा पाहावा. लोकांनी जो निकाल दिला आहे, तो स्वीकारावा. खरे तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक लोक रोज पक्षाला रामराम ठोकून शिंदे यांच्या पक्षात जात आहेत पण त्यावर उद्धव ठाकरे कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाहीत. मध्यंतरी त्यांनी एक बैठक घेतली आणि सर्वांना एकत्र राहण्याचे आवाहन केले, पण त्याकडे लक्ष देणे, आपल्या पक्षाच्या वाढीकडे लक्ष देणे हे सोडून अजूनही ते टोमणे मारण्यात मश्गुल आहेत.
बरे त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महाकुंभचा आधार घेतला. एकप्रकारे त्यांनी या भव्य सोहळ्याची थट्टा उडवली. महाकुंभच्या काळात अशी थट्टा उडवणाऱ्यांची संख्या मोठी होती. पण देशविदेशातील भाविकांनी या सगळ्यांना जोरदार उत्तर दिले. तब्बल ६६ कोटी लोकांनी इथे उपस्थिती दर्शवली. मात्र याबद्दल टीका करणे यातच विरोधकांनी धन्यता मानली. त्यात उद्धव ठाकरेही आहेत हे त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे.
कारण आपण हिंदुत्वाचे खरे पाईक आहोत असा दावा ते करत आले आहेत. अशावेळी त्यांनी निदान महाकुंभवर टीका तरी करायला नको होती. पण ती त्यांनी केली. एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप करत महाकुंभची थट्टा उडवली पण त्यांचे नेते डी.के. शिवकुमार, दिग्विजय सिंह मात्र डुबकी मारून आले. यातून त्यांचा दुटप्पीपणा दिसला मात्र पक्षातील काही लोक आपल्या आस्था, श्रद्धा यांचे पालन करतात हेही स्पष्ट झाले. ते उद्धव ठाकरे यांना करता आले नाही. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश गंगेत डुबकी मारून आले पण तेवढेही उद्धव यांना जमले नाही.
मागे एका भाषणात ते म्हणाले होते की, माझ्या पक्षाला हादरा किंवा धक्का बसल्याचा बातम्या येत असतात. त्यामुळे मी धक्कापुरुष बनलो आहे. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यावर सतत गद्दारीच्या शिक्क्याचे आरोप करून ते शिक्का पुरुष बनले आहेत. या पलीकडे त्यांच्या हाती काहीही नाही. ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे हात रिकामे आहेत.