सायबर फसवणुकीच्या नव्या पद्धतींनी नागरिकांचे आर्थिक नुकसान वाढत असताना, मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्यांविरोधात जनजागृतीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पश्चिम उपनगरातील परिमंडळ ९ मध्ये विशेषतः एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुंबईत ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीचे तब्बल १२८ गुन्हे नोंदवले गेले असून, या माध्यमातून पीडितांकडून जवळपास १०१ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सायबर शाखेने झोन ९ मधील ८४७ वृद्ध नागरिकांची ओळख पटवून त्यांच्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला.
सायबर पोलिसांच्या २९ अधिकाऱ्यांचे व ६९ कर्मचाऱ्यांचे पथक या नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक कशी घडते, कोणत्या प्रकारे गुन्हेगार सरकारी अधिकाऱ्यांचे सोंग घेतात, याची सविस्तर माहिती दिली. तसेच मराठी व इंग्रजी भाषेत माहितीपत्रके वाटप करून सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या.
हे ही वाचा:
तीन सेमीकंडक्टर प्लांट्समध्ये पायलट उत्पादनाला सुरुवात
भारतीय संघासाठी ममता यांची पोस्ट आणि भाजपाने ‘त्या’ विधानाची केली आठवण
विश्वविजेत्या महिला संघाला बीसीसीआयकडून ५१ कोटी
व्हेज बिर्याणीऐवजी नॉन-व्हेज बिर्याणी पाठवली
या मोहिमेला ज्येष्ठ नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, त्यांनी मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पोलिस उपायुक्त (सायबर) पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले की, “फसवणूक करणारे बहुतेक वेळा पोलिस, सीबीआय, ईडी किंवा आरबीआय अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना धमकावतात. विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाची मर्यादित माहिती असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ते सोपे लक्ष्य बनवतात.” त्यांनी पुढे सांगितले की, सायबर सेलने एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांचा डेटाबेस तयार केला असून, त्यांना अशा फसवणुकींच्या धोक्यांबद्दल सतत शिक्षित केले जात आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणताही संशयास्पद कॉल, मेसेज किंवा ईमेल आल्यानंतर त्वरित १०० किंवा १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशा प्रकरणांची नोंद www.cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.







