करोना काळात मुंबई महापलिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना या प्रकरणात जामीन मिळाला आहे. एक लाखाच्या रोख मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. खिचडी घोटाळ्यात ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केली होती.
खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीने आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांना १७ जानेवारी २०२४ रोजी अटक केली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण प्रकाशझोतात आणून उचलून धरले होते. यानंतर या प्रकरणात कारवाई दरम्यान सूरज चव्हाण यांना अटक झाली होती. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने सूरज चव्हाण यांना एक लाखाच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सूरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठपुढे सुनावणी झाली.
हे ही वाचा:
अमेरिकेत बेकायदेशीपणे राहणारे भारतीय स्थलांतरित लष्कराच्या विमानाने भारताकडे रवाना
मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
ठरलं! पंतप्रधान मोदी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प फेब्रुवारीमध्ये अमेरिकेत भेटणार
सहकार्य दाखवताच अतिरिक्त करामधून कॅनडा, मेक्सिकोला तात्पुरती सूट; चीनवरील १० टक्के कर लागू
प्रकरण काय?
मुंबई महानगरपालिकेत करोना काळात मोठमोठे गैरव्यवहार आणि घोटाळे झाल्याची बाब उघडकीस आली होती. महापालिकेतील बॉडी बॅग घोटाळाही चर्चेत आहे. अशातच खिचडी घोटाळाही समोर आला आहे. करोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी आणि ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या ठाकरे सरकारने घेतला होता. मुंबई महापालिकेने एकूण ५२ कंपन्यांना खिचडी देण्याचं कंत्राट देण्यात आले होते. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला.