बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी राज्यात वातावरण तापले असून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी वाल्मिक कराड यालाही अटक करण्यात आली असून तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. दरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाचं आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल ८८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी पुरावे दाखवत हे आरोप केले आहेत.
नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यामध्ये घोटाळा झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. भ्रष्टाचार समोर आला असून भगवानगडाने धनंजय मुंडे यांचा पाठिंबा काढून घ्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने २०१६ साली शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या (DBT) माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले होते. राज्य सरकारला हे आदेश बंधनकारक होते. मात्र, धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते असताना त्यांनी शेतीसंबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी करताना घोटाळा केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित न करता अनेक वस्तू बाजारपेठेतून खरेदी करण्यात आल्या. प्रत्येक गोष्टीमागे बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट पैसे मोजण्यात आले, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
“नॅनो युरियाचा दर १८४ रुपये प्रति लिटर आहे. ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ९२ रुपये लागतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्यात २२० रुपयात बॉटल घेतली गेली. एक बॉटल बाजारात ९२ रुपयाला मिळते. पण मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपये दराने घेतल्या म्हणजेचं दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेण्यात आल्या,” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच नॅनो डीएपीची किंमत ५२२ रुपये प्रति लिटर आहे. ५०० मिलिलीटरची बॉटल २६९ रुपयाला मिळते. सरकारने एकूण १९ लाख ५७ हजार ४३८ बॉटल घेतल्या घेतल्या. त्याचा बाजार भाव २६९ रुपये, पण कृषी मंत्र्यांनी ५९० रुपयाला खरेदी केली आहे. हे दोन्ही घोटाळे ८८ कोटींचे आहेत असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
“बॅटरी स्पेअर हा टु इन वन असून एमएआयडीच्या वेबसाईटवर मिळतो. एमएआयडीच्या वेबसाईटवर २९४६ रुपयाला विकला जातो. कृषी मंत्र्यांनी टेंडर काढलं आणि ३४२६ रुपयाला ही बॅटरी विकत घेतली. एक हजाराच्या वर एक बॅटरी स्पेअरवर कमावले,” असा आरोपही अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच डीबीटी योजनेत ५ लाखांहून अधिक लाभार्थी होणार होते. यासाठी बजेट ठरलं होतं, पण उत्पादनांच्या किंमती जास्त दाखवून कमी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
मेटाल्डे हाइड हे पीआयए कंपनीचे पेटेंटेड उत्पादन असून हे बल्कमध्ये घेतल्यावर स्वस्त मिळतं. रिटेलमध्ये या उत्पादनाचा दर ८१७ रुपयाला आहे. पण कृषी मंत्री मुंडेंनी १२७५ रुपयाला हे उत्पादन विकत घेतलं. एकूण १ लाख ९६ हजार ४४१ किलो विकत घेतलं. कॉटन स्टोरेज बॅग ६ लाख १८ हजार घेतल्या. काही दिवसांपूर्वी आयसीएआय नावाच्या संघटनेने २० बॅगा घेतल्या ५७७ रुपया प्रमाणे घेतल्या. पण धनंजय मुंडेंनी टेंडरमधून १२५० रुपयाला घेतल्या, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.
हे ही वाचा:
खिचडी घोटाळा प्रकरणातील आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सूरज चव्हाणांना जामीन मंजूर
अमेरिकेत बेकायदेशीपणे राहणारे भारतीय स्थलांतरित लष्कराच्या विमानाने भारताकडे रवाना
मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
ठरलं! पंतप्रधान मोदी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प फेब्रुवारीमध्ये अमेरिकेत भेटणार
धनंजय मुंडे हे एकचं वर्ष पदावर होते. एका वर्षात त्यांनी अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का? असा सवाल करत अंजली दमानिया यांनी मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे. तसेचं हे सर्व पुरावे भगवान गडावर दाखवून त्यांनी धनंजय मुंडेंना दिलेला पाठिंबा मागे घ्यावा अशी नम्र मागणी करणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.