तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. या मुद्यानंतर देशभरात गदारोळ निर्माण झाला होता तर, केंद्र सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली होती. आता या प्रकरणात नवे अपडेट समोर आले असून केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने लाडूमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या भेसळी संदर्भात चार जणांना अटक केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. अटक करण्यात आलेले व्यक्ती हे तिरुमला तिरुपती देवस्थानमला तूप पुरवणाऱ्या संस्थांशी संबंधित आहेत. तामिळनाडूतील एआर डेअरी, उत्तर प्रदेशातील पराग डेअरी, प्रीमियर ऍग्री फूड्स आणि अल्फा मिल्क फूड्स यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भोले बाबा डेअरीचे (रूरकी, उत्तराखंड) माजी संचालक बिपिन जैन आणि पोमिल जैन, वैष्णवी डेअरीचे (पूनमबक्कम) सीईओ अपूर्व विनय कांत चावडा आणि एआर डेअरीचे (डुंडीगल) एमडी राजू राजशेखरन यांचा समावेश आहे.
सीबीआय हैदराबाद विभागाचे सहसंचालक वीरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी सुरू आहे, ज्यात विशाखा सीबीआयचे एसपी मुरलीरंबा, डीआयजी गोपीनाथ जेट्टी, आयजी सर्वश्रेष्ठ त्रिपाठी आणि एफएसएसएआय अधिकारी सत्यकुमार पांडा यांचा समावेश आहे. तिरुमला, तिरुपती आणि तमिळनाडूमधील एआर डेअरीच्या सुविधेसह अनेक ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. टीटीडीशी करार असलेला एआर डेअरी अनेक अनियमिततांमध्ये दोषी आढळला आहे. तपासावर देखरेख ठेवण्यासाठी सहसंचालक वीरेश प्रभू यांना तिरुपतीमध्ये तैनात करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा!
श्रद्धा वालकरच्या अंत्यसंस्काराची वाट पाहणाऱ्या पित्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू!
भाजपाच्या विजयी आमदाराने दिल्लीतील मुस्तफाबादचे नाव बदलण्याची केली घोषणा
आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या अमरावती येथे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री नायडू यांनी हा मुद्दा उठवला होता. वायएसआरसीपी सरकारने जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरात लाडू बनवताना निकृष्ट घटकांचा वापर केला होता. शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती, असा खळबळजनक आरोप केला होता. मात्र, वायएसआरसीने नायडू यांचे आरोप साफ फेटाळून लावले आहेत.