नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘इंडी’ आघाडीचे घटक पक्ष असलेल्या आप आणि काँग्रेसमध्ये बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले. हे दोन्ही पक्ष निवडणूक स्वतंत्र लढले आणि दोन्ही पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेस पक्षाला तर भोपळाही फोडता आला नाही. यावरून इंडी आघाडीमधील घटक पक्षांनी दोन्ही पक्षांना सुनावले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेस आणि आपला खडेबोल सुनावले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, “बटेंगे तो कटेंगे हा संदेश नरेंद्र मोदींनी फक्त देशाला नाही तर इंडी आघाडीलाही दिला आहे. लोकसभेला इंडी आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो. सर्व घटक पक्षांनी एकमेकांसाठी काम केले. मात्र, त्यानंतर राज्याराज्यांमधील निवडणुकांमध्ये इंडी आघाडीचे गणित जमू शकले नाही. महाराष्ट्रात, दिल्लीत जमले नाही आणि आता भविष्यातही निवडणुका आहेत. म्हणजे राज्य भाजपच्या हातात द्यायची का?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. लोकसभेत इंडी आघाडीला चांगला निकाल मिळाला कारण बैठका आणि चर्चा सातत्याने होत होत्या, असंही संजय राऊत म्हणाले.
इंडी आघाडी किंवा महाविकास आघाडी ही केवळ निवडणूक लढवण्यासाठी आहे का? लोकांच्या भावना आहेत की, विविध प्रश्नांसाठी या आघाड्यांनी एकत्र यावे. इंडी आघाडी सध्या फक्त ससंदेत दिसत आहे. या आघाडीने संसदेच्या बाहेर दिसणंही अत्यंत महत्त्वाचे आहे, असा सल्ला संजय राऊत यांनी आघाडीला दिला आहे.
हे ही वाचा :
मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत आठ कॅडर्सला अटक
तिरुपती लाडू प्रकरण: तुपाच्या भेसळी संदर्भात चार जणांना अटक
हरियाणातील नूह येथून ५ बांगलादेशी पकडले, पश्चिम बंगालला जाण्याच्या होते तयारीत!
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक
काँग्रेस पक्ष हा इंडी आघाडीतील बिग ब्रदर आहे. तो राष्ट्रीय पक्ष असून १०० जागा त्यांच्याकडे आहेत आणि १०० हून अधिक जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पण ते केव्हा जेव्हा आम्ही एकत्र असू तेव्हाच, असा खोचक टोला संजय राऊत यांनी काँग्रेसला लगावला आहे. फक्त जागावाटपात खेचाखेची करण्यासाठी आघाड्या नको; समन्वय पण हवा, अशी टीकाही संजय राऊत यांनी काँग्रेसवर केली आहे.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत तरी इंडी आघाडी एकत्र दिसेल का? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव हे आघाडीबाबत सकारात्मक आहेत. अखिलेश यादवही सकारात्मक दिसत आहेत. आमच्यासारख्या इतर पक्षांचीही सकारात्मक भूमिका आहे, कारण आम्ही ते लोकसभेला करून दखवलं आहे. लोकसभेला महाराष्ट्रात, उत्तर प्रदेशमध्ये एकत्र राहून, भाजपाचे आव्हान मोडून काढलं होतं.