बोरिवलीतील गणपत पाटील नगर येथे रविवारी सायंकाळी पूर्ववैमनस्यातून दोन कुटूंबात झालेल्या वादात तीन जणांचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले होते. या घटनेचा व्हिडीओ सोमवारी (१९ मे) समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये दोन कुटूंबियांनी एकमेकांवर केलेल्या तीक्ष्ण हत्याराने केलेल्या हल्ल्याचे दृश्य कैद झाले आहे.एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही कुटूंबावर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली आहे. समाज माध्यमावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ गुन्ह्यातील महत्वाचा पुरावा म्हणून पोलिसांनी व्हिडीओ ताब्यात घेतला आहे.
रामनवल गुप्ता, अरविंद रामनवल गुप्ता आणि हमीद नसीरुद्दीन शेख असे या हाणामारीत ठार झालेल्या तिघांची नावे आहेत, तर जखमींमध्ये अमर रामनवल गुप्ता, अमीत रामनवल गुप्ता, अरमान हमीद शेख आणि हसन हमीद शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बोरिवलीतील या तिहेरी हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रामनवल गुप्ता आणि हमीद शेख हे दोन कुटुंबे बोरिवलीतील गणपत पाटील नगर परिसरात राहतात.रामनवलचा परिसरात फळ-नारळ विक्रीचा तर हमीद शेखचा चहाचे एक दुकान आहे. गेल्या तीन वर्षांपासून या दोन्ही कुटुंबामध्ये जुना वाद होता. हमीदच्या एका नातेवाईकाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या नातेवाईकाच्या मृत्यूस गुप्ता कुटुंबिय जबाबदार असल्याचा आरोप शेख कुटुंबियांनी केला होता. त्यानंतर त्यांच्यातील वाद विकोपास गेला होता.
या वादातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. गेल्या वर्षी दोघांनी एकमेकांविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रारी केल्या होत्या. रविवारी सायंकाळी साडेचार वाजता रामनवल हा त्याच्या गणपत पाटील नगर येथील नारळ विक्री स्टॉलवर काम करत होता. यावेळी तिथे दारुच्या नशेत हमीद आला होता. यावेळी त्यांच्या जुन्या वादातून शाब्दिक वाद झाला, या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोन्ही कुटूंबातील पुरुषांनी एकामेकावर तीक्ष्ण हत्याराने वार केले, हा सर्व प्रकार भररस्त्यात सुरू होता, हा सर्व प्रकार अनेकांनी आपल्या मोबाईल फोन च्या कॅमेरात कैद करून हे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आले.
हे ही वाचा :
हेरगिरी प्रकरणातील ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक
संतापजनक! दहशतवादी खालिदवर पाकच्या ध्वजासह शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
तृणमूल काँग्रेसच्या युसूफ पठाणने सरकारच्या शिष्टमंडळाचे निमंत्रण नाकारले!
जम्मू- काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक
स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती समजताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या सर्वांना तातडीने जवळच्या लोटस आणि शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान रामनवल गुप्ता, त्याचा मुलगा अरविंद गुप्ता आणि हमीद शेख या तिघांचा मृत्यू झाला तर इतर चौघांवर तिथे उपचार सुरु आहेत.
तिहेरी हत्येच्या वृत्तानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती. तिहेरी हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही कुटूंबावर हत्येसह हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले.एका गुन्ह्यांत हसन शेख याला पोलिसांनी अटक केली. इतर जखमींवर उपचार सुरु असून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
