मुंबई शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे, ड्रग्सच्या गुन्ह्यात आर्थर रोड तुरुंगात असलेल्या अंडरट्रायल कैद्याने तारखेला तुरुंगातून बाहेर येऊन मित्राच्या दुचाकीवरून मनसेचे उपाध्यक्ष अमित मटकर यांच्या कार्यालयात येऊन त्यांना धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार घडला त्या वेळी आरोपीला तुरुंगातून न्यायालयात घेऊन जाणारे सशस्त्र दलाचे पोलिस कुठे होते व त्यांनी आरोपीला मोकाट सोडले होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे सशस्त्र दलाचे पोलीस संशयाच्या फेऱ्यात आले आहेत. हा प्रकार १६ मे रोजी दुपारी आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
हे ही वाचा:
संयुक्त अरब अमिराती दहशतवादाविरोधात भारतासोबत
उत्तर कोरियाचे युद्धनौका प्रक्षेपण अपयशी
देशविरोधी कारवाया करणाऱ्या ज्योती मल्होत्राची रवानगी पोलिस कोठडीत
ग्रीसला सुनामीचा इशारा
या प्रकरणी मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष अमित मटकर यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आणि सीसीटीव्ही फुटेज देऊनही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेची चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधिकारी यांचे म्हणणे आहे.
इम्रान खान असे या अंडरट्रायल कैद्याचे नाव आहे. डिसेंबर २०२४ मध्ये इम्रान खानला मुंबई गुन्हे शाखा कक्ष ४ च्या पथकाने ४० किलो गांजासह अटक केली होती. ७ डिसेंबर २०२४ रोजी इम्रान खानची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. ड्रग्स माफिया इम्रान खान हा अद्यापही अंडरट्रायल कैदी म्हणून आर्थर रोड तुरुंगात आहे.
१६ मे २०२५ रोजी इम्रान खान याला सत्र न्यायालयात तारखेला आणले गेले होते, तुरुंगातून न्यायालयात आणि न्यायालयातून तुरुंगात पुन्हा सोडण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या सशस्त्र दलाच्या पोलीस जवानांची असते.
इम्रानला दुपारी दीडच्या सुमारास सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने त्याला पुढील तारीख दिल्यानंतर त्याला पुन्हा आर्थर रोड तुरुंगात सोडण्याची जबाबदारी सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांची होती, मात्र इम्रान खान हा मित्राच्या दुचाकीवरून चेहऱ्याला मास्क लावून मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष अमित मटकर यांच्या जे. आर. बोरीचा मार्ग येथे आला आणि त्याने अमित मटकर “तु इधर क्यु बैठा है,बैठने का नही, नही तो समझ जा” अशी धमकी दिली आणि तेथून निघून गेला. हा सर्व प्रकार अमित मटकर यांच्या कार्यालयाबाहेर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
अमित मटकर यांनी याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात २१ मे रोजी तक्रार अर्ज आणि सीसीटीव्ही चे फुटेज पोलिसांना दिले आहे, मटकर यांनी अर्जात म्हटले आहे की, धमकी देणारी व्यक्ती ही मटकर यांच्यावर २०१७ मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीच्या संबंधित असून ही व्यक्ती मला धमकावण्याच्या हेतुने या ठिकाणी आलेली होती असा आरोप अर्जात करण्यात आला आहे. आग्रीपाडा पोलिसांनी या अर्जाची दखल घेऊन चौकशी सुरू केली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.या सर्व घटनेनंतर सशस्त्र पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत आहे.
