जवळचा मित्र जेव्हा तुमच्या विरोधात जातो तेव्हा तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू बनतो. अमेरिकी उद्योगपती एलॉन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतीत असेच म्हणण्याची वेळ आलेली आहे. अमेरिकेत कालपासून एका खळबळजनक प्रकरण उकरले गेले आहे. त्याची सुरूवात मस्क यांच्या एका पोस्टपासून झाली. ऐकणाऱ्याला ‘सामना’तला मारुती कांबळे आठवू शकतो किंवा मविआच्या काळात बळी गेलेला मनसुख हिरण. काहींना एका अभिनेत्यासोबतच महाराष्ट्रातील एका तरुण नेत्याचे लफडे आठवू शकते. येत्या काळात अमेरिका या प्रकरणामुळे ढवळून निघेल अशी शक्यता आहे.
एक असा उद्योगपती जो अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या पाठीशी पहाडासारखा राहिला. ज्यांच्यामुळे ट्रम्प यांचा विजय सोपा झाला. तोच आता अमेरिकेत एका नव्या पक्षाची गरज आहे, अशी पोस्ट एक्सवर टाकतो आहे. ‘बिग ब्युटीफूल बिला’ला विरोध करत मस्क यांनी ‘डीपार्टमेंट ऑफ गर्व्हर्नमेंट एफीशिअन्सी’ज राजीनामा दिला. सरकारमधून बाहेर पडताना त्यांनी ट्रम्प यांचे आभार मानले असले तरी, इथून ठिणग्या पडायला सुरूवात होणार याचा अंदाज मस्क आणि ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांना होताच.
टेरीफच्या मुद्द्यावरून अमेरिकेने चीनच्या विरोधात उघडलेली आघाडी, यूटर्न घेत भारताशी घेतलेला पंगा, बिग ब्यूटीफूल बिलात इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणाऱ्या टेस्लाच्या विरोधातील तरतुदी, या सगळ्या मुद्द्यांमुळे मस्क यांनी ट्रम्प यांच्याशी काडीमोड घेतला. ‘हम तो डुबेंगें सनम, तुम्हे भी साथ ले डुबेंगे….’ असा काहीसा ट्रम्प यांचा इरादा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
जवळच्या माणसाला गुपित माहीत असतात. एलॉन मस्क हे गेले काही महिने ट्रम्प यांच्या इतके जवळ होते की, त्यांनाही बरेच काही माहिती आहे. ही माहिती आता ते टप्प्याटप्प्याने चव्हाट्यावर आणणार असे दिसते आहे. जेफ्री एपस्टिन प्रकरण हे त्यातलेच एक. हा अमेरिकेतील एक बदनाम फंड मॅनेजर. कोवळ्या मुलींचे लैंगिक शोषण, सेक्स ट्रॅफीकींग, सेक्स रिंग अशा अनेक प्रकरणात बरबटलेला. जुलै २०१९ मध्ये लहान मुलींच्या सेक्स ट्रॅफीकींग प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. अवघ्या एका महिन्यात १० ऑगस्ट २०१९ रोजी मॅनहॅटन तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा खून झाला असावा, अशी चर्चा अगदी सर्वसामान्यांच्या तोंडी होती.
तो लहान मुलींची तस्करी करत होता. लैंगिक शोषणासाठी अमेरिकेतील धनदांडगे या मुलींचा वापर करायचे. त्यामुळे जेफ्रीला बऱ्याच लोकांच्या भानगडी माहिती होत्या. काही लोकांविरुद्ध त्याने या माहितीचा वापर केला असण्याची शक्यता आहे. ‘ए मॅन हू न्यू टू मच’ हा आल्फेड हिचकॉकचा गाजलेला रहस्यपट. ज्यांच्याकडे खूप गुपिते असतात अशी माणसे अनेकांना खूपत असतात. ती कायमची शांत होण्यात त्या बड्यांचा फायदा असतो. लहान मुलींच्या तस्करीच्या या गुन्ह्यात काही बडी मंडळी सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यातूनच एपस्टिनचा काटा काढण्यात आला.
जेफ्री एपस्टिन तोंड उघडेल या भीतीने त्याला थंड करण्यात आले. सहा वर्षांनी हे प्रकरण पुन्हा उकरले गेले आहे. पुन्हा एकादा अमेरिकेत त्याची जोरदार चर्चा आहे. काल मध्यरात्री एलॉन मस्क याने एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्याचा उल्लेख होता.
जेफ्रीच्या फाईलमध्ये ट्रम्प यांचे नाव आहे. त्यामुळे ही फाईल उघड करण्यात आली नाही. असा मस्क यांच्या पोस्टचा आशय आहे. संबंध बिघडल्यानंतर ट्रम्प आणि मस्क एकमेकांवर वार करण्याचा प्रयत्न करतायत. ही हाणामारी सुरू असताना मस्क यांनी थेट ट्रम्प यांच्या लंगोटीला हात घातला आहे.
या प्रकरणामुळे ट्रम्प गोत्यात येणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या पहील्या टर्ममध्ये जेफ्रीचा तुरुंगात मृत्यू झाला. परंतु २०२१ ते २०२४ या काळात अमेरिकेत डेमोक्रॅट्सची सत्ता असताना हे प्रकरण उघड का झाले नाही, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचे कारण स्पष्ट आहे. जेफ्री हा फंड मॅनेजर म्हणून बड्या धेंडाचे पैसे सांभाळायचा. ब्रिटनचे प्रिन्स एन्ड्रू यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. या व्यतिरिक्त अमेरिकेतील तीन बडी नावे होती. डोनाल्ड ट्रम्प, एलॉन मस्क आणि बिल क्लिंटन. डेमोक्रॅट्सचे बडे नेते म्हणून बिल क्लिंटन ओळखले जातात. शिवाय जेफ्री अमेरिकेतील ज्या बड्या धेंडाना कोवळ्या मुली पुरवायचा त्यात सर्व पक्षीय नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व पक्षीय नेत्यांना दलाल लागतातच.
२००८ साली जेफ्रीला कोवळ्या वयाच्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याबद्दल अटक झाली. परंतु फक्त १३ महिन्यांची सजा होऊन तो स्वस्तात सुटला. त्याच्या सुटके मागे त्याचे बड्या लोकांशी असलेले संबंध कारणीभूत होते, अशी उघड चर्चा होती. हे जेफ्री प्रकरण ट्रम्प यांना चिकटण्याची शक्यता जास्त आहे.
हे ही वाचा:
सिंधू करार बंदीमुळे पाकचा घसा कोरडा, भारताला लिहिली चार पत्रे!
राहुल गांधी सांगा कुणाचे? चीनचे, पाकिस्तानचे की अमेरिकेचे?
छत्तीसगढ: १ कोटीचं बक्षीस असलेला नक्षली सुधाकर ठार!
संपलेला पक्ष अन आता एकत्र येण्याची भाषा, आरारा… काय वाईट दिवस!
ट्रम्प आणि जेफ्री यांचे संबंध १९९० पासूनचे. दोघेही अय्याश असल्यामुळे ‘समान शील व्यसनेशू सख्यं…’ या सूत्रानुसार दोघांची घट्ट मैत्री होती. दोघेही फ्लोरीडाच्या पाम बीच या उच्चभू वस्तीत राहात होते. २००२ मध्ये ट्रम्प यांनी न्यूयॉर्क मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत त्याच्याबद्दल म्हटले होते. ‘एपस्टीन हा मस्त माणूस आहे. माझ्या प्रमाणे त्यालाही देखण्या महिला आवडतात. त्यातल्या काही तर खूपच कोवळ्या आहेत.’
ट्रम्प यांच्या मालकीच्या ‘मार ए लागो’ क्लबमध्ये जेफ्री एपस्टीनचे नियमित येणे जाणे असे. इथल्या एका मुलीला एपस्टीनने देहविक्रयाच्या धंद्यात खेचण्याचा प्रयत्न केला, तेव्हापासून ट्रम्प यांचे जेफ्रीशी संबंध ताणले गेले. ट्रम्प यांनी त्याला क्लबमध्ये येण्यास मज्जाव केला. २०१९ मध्ये जेव्हा एपस्टीनला अटक झाली तेव्हा ट्रम्प यांनी हात झटकले. पाल्म बीच येथे राहणारे लोक एपस्टीनला जेवढे ओळखतात तेवढा मीही ओळखतो, असे सांगून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु यात फार तथ्य नसावे.
एपस्टीनच्या मालकीच्या सेंट जेम्स बेटावर ट्रम्प यांचा मित्र परिवार गेला होता, अशी चर्चा त्यानंतर जोरात होती. म्हणजे सार्वजनिक पातळीवर ट्रम्प यांनी एपस्टीनशी संबंध तोडले असले तरी एपस्टीन आणि ट्रम्प यांच्या आवडीनिवडी सारख्या असल्यामुळे पडद्याआड हे संबंध कायम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे संबंध होते, आणि एपस्टीन याने ट्रम्प यांच्यासोबत अनेकदा विमान प्रवास केला आहे, अशा आशयाच्या अनेक पोस्ट तुम्हाला मस्क यांच्या एस्क अकाऊंटवर दिसतील.
मस्क यांच्या पोस्ट आणि एपस्टीन याचा इतिहास पाहून अनेकांना महाराष्ट्राच्या राजकारणाशी तुलना करण्याचा मोह होऊ शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणात बॉलिबूडचा एक फ्लॉप एक्टर आणि तरुण राजकीय नेत्याबाबत चर्चा सुरू आहे. या नेत्याला लहान मुलांची विशेष आवड असल्याचे आरोपही झालेले आहेत. अनेकांना या प्रकरणात मनसुख हिरणची आठवण होऊ शकते. एकूणच अमेरिकेत सुरू झालेला हा नवा वादंग धुरळा उडवणार हे निश्चित.
एलॉन मस्क हा राजकारणी नाही, व्यावसायिक आहे. ट्रम्प हे सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असले तरी त्यांचा पिंड हा व्यावसायिकाचाच आहे. त्यामुळे मस्क आणि ट्रम्प ही आरपारची लढाई होईल की फायद्याचा सौदा होऊन समेट होईल हे येणारा काळ सांगेलच.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
