26 C
Mumbai
Monday, February 10, 2025
घरसंपादकीयलोकशाहीचे गद्दार कोण ? झुक्या की फुक्या ?

लोकशाहीचे गद्दार कोण ? झुक्या की फुक्या ?

जनता एक आहे, तोपर्यंत देश सेफ आहे.

Google News Follow

Related

जगात अनेक घटना घडत असतात. प्रत्येक घटनेचा एकमेकांशी संबंध असेलच हे आवश्यक नाही. परंतु देशाची चिंता करणाऱ्या प्रत्येक सजग नागरीकाला या घडामोडींवर लक्ष ठेवणे भाग असते, त्यांचा आपसात काही संबंध आहे का, हे
तपासणे गरजेचे असते. ‘मोदी निवडणूक हरले आहेत’, हे ‘मेटा’चे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग, यांचे विधान, ‘हिंडेनबर्ग शॉर्ट सेलिंग एण्ड रिसर्च फर्म’ने आपले दुकान बंद झाले, अशी केलेली घोषणा आणि काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन
करताना राहुल गांधी यांनी तोडलेले अकलेचे तारे, या तिन्ही घटना वरकरणी वेगळ्या दिसत असल्या तरी यात एक समान सूत्र आहे. हे सूत्र आहे, एका व्यापक भारतविरोधी षडयंत्राचे. एक असे षडयंत्र ज्याला कोणतीही कालमर्यादा
नाही. जोपर्यंत ते यशस्वी होत नाही, तोपर्यंत ते रेटण्यात येणार आहे. भारताचे सुदैव एवढेच की षडयंत्रकाऱ्यांची वेळ बरी नाही.

बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापालटात अमेरीकी डीप स्टेटचा हात होता, मोहमद युनूस हे सत्ताधारी डेमोक्रॅट्सच्या हातचे कळसूत्री बाहुले आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी सेंट मार्टीन बेट
अमेरीकेच्या सैन्य तळासाठी बहाल करण्यास नकार दिल्यामुळे हे सत्तांतर घडवण्यात आले. ‘बांगलादेशात जे घडले ते भारतातही हे घडू शकते’, असे विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केले होते. अमेरीकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला असता तर त्या दिशेने निश्चितपणे प्रयत्न झाले असते. परंतु ट्रम्प विजयी झाले आणि लोकशाहीच्या गारद्यांना हे षडयंत्र आटोपते घ्यावे लागले. ट्रम्प अमेरीकेत ज्या डीप स्टेट्सशी लढतायत, त्याच डीप
स्टेटच्या हस्तकांना भारतात नरेंद्र मोदी नको आहेत.

अमेरीकेचे अध्यक्ष जो बायडन जाण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. ट्रम्प यांचे राज्यारोहण अवघ्या तीन दिवसांवर आले आहे, तरीही अमेरीकी डीप स्टेटचे उपद्व्याप बंद झालेले नाहीत. ‘जो रोगन शो’ या प्रसिद्ध अमेरिकी पॉडकास्टमध्ये झुकरबर्ग यांनी सार्वत्रिक निवडणुकीत मोदी पराभूत झाल्याचा दावा केला होता. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपाच्या अनेक वरीष्ठ नेत्यांनी झुकरबर्ग यांना व्यवस्थित झापल्यानंतर झुरकबर्गने हे विधान मागे घेऊन माफी मागितली.
झुकरबर्ग हा काही सोम्यागोम्या नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप सारखे प्रभावी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्याच्याकडे आहेत. त्याने भारतातील निवडणूक प्रक्रीयेबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होईल, असे विधान केले आणि भारत सरकारकडून बांबू आल्यावर मागे घेतले. माफी मागितल्यानंतरही हा प्रश्न उरतोच की हे विधान करण्याचे कारण काय होते?

हे ही वाचा:

बांगलादेशी, रोहींग्याना अनधिकृत जन्मतारखेचे दाखले, सोमय्यानी केली तक्रार!

रशियन सैन्यात लढणाऱ्या १२ भारतीयांचा मृत्यू, १६ बेपत्ता!

महाकुंभ मेळ्याला ‘अंधश्रद्धा’ संबोधणारे पोस्टर्स, साहित्य नागा साधूंनी केले उद्ध्वस्त

एसटी बँकेत गोलमाल! भरती, बदली, प्रोत्साहन भत्ता व बोनसच्या नावाने करोडो लाटले?

अमेरीकेतील एका उद्योगपतीला भारताच्या फाटक्यात पाय घालण्याची गरज का वाटावी? नवी दिल्लीतील नव्या काँग्रेस मुख्यालयाचे उद्घाटन करताना राहुल गांधी यांनी काँग्रेसची लढाई भाजपासोबत, एका राजकीय पक्षासोबत नसून इंडीयन
स्टेटसोबत असल्याचा दावा केला. त्याच वेळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या दिवशी मतदानाच्या अखेरच्या एका तासात मतदान एक कोटीने वाढले. हे संशयास्पद असून हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे विधान केले. या दोन्ही विधानांच्या मागे असलेले प्रेरणा ही अमेरीकी डीप स्टेटची आहे. झुकरबर्ग यांनी तर काही दिवसापूर्वी कबूली दिली होती. मेटा आणि ट्विटरवर असलेल्या दबावामुळे आम्हाला डीप स्टेटच्या तालावर नाचावे लागले. आता तोच दबाव पुन्हा आला नसेल यांची हमी कोणी द्यावी. लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी जाहीर सभांमधून सांगत होते. भाजपाला १५० जागांचा टप्पा ओलांडता येणार नाही. प्रियांका वाड्रा त्यांच्या पेक्षा जास्त उदार होत्या त्यांनी भाजपाला १८० जागा देऊ केल्या होत्या.

 

‘भाजपाने मॅच फिक्सिंग करून निवडणुका जिंकल्या आणि घटना बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल.’ हे विधान लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीत राहुल गांधी यांनी अनेकदा केले. भाजपाला घवघवीत यश मिळाले तर निवडणूक आयोगावर खापर फोडायचे अशी ही रणनीती होती. प्रत्यक्षात झालेही तसेच. मुख्यालयाचे उद्घाटन करताना
राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालाबाबतही तीच टेप वाजवतायत. एकच गोष्ट सतत बोलत राहायची. अनेकांनी तेच तेच सांगत राहायचे. जेणे करून सर्वसामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होईल. लोकशाही प्रक्रीयेवरचा त्याचा विश्वास उडून जाईल. लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, तरीही राहुल गांधी तेच बोलतायत.

देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आलेले आहे. हे सरकार मजबूतीने काम करते आहे. देशात आग पेटवण्याची महत्वाकांक्षा मात्र कायम आहेत. काही विदेशी शक्तींनाही समर्थ, संपन्न आणि सुसज्ज भारत नको
आहे. बुधवारी मुंबईत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आएनएस सुरत ही युद्धनौका, आयएनएस नीलगिरी ही फ्रिगेट आणि आयएनएस वाग्शीर या पाणबुडीचे लोकार्पण केले. या तिन्हीची निर्मिती भारतात झालेली आहे, तीही केवळ दोन वर्षात. हे भारताच्या शत्रूंना काय मित्रांनाही अस्वस्थ करणारे आहे. भारताची ही वाढती ताकद बड्या शक्तिंना खुपल्याशिवाय कशी राहील. त्यामुळे विदेशी शक्तींनाही भारतात आग पेटवायची आहे, त्यांना भारत अस्थिर करायचा
आहे. भारतातला एखादा जयचंद त्यांनाही हवाच आहे.

बांगलादेशातील सत्तांतरानंतर काँग्रेस पक्षाला प्रचंड उकळ्या फुटल्या होत्या. भारतातही आपण अराजकाच्या मार्गाने सत्तेवर येऊ अशी स्वप्ने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पडली होती. त्यांच्या दुर्दैवाने अमेरिकेत डेमॉक्रॅट्सचा पराभव झाला. भारतातील हरीयाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यात काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला. मोदींना आपण सत्तेवरून हलवू शकत नाही, हे राहुल गांधी यांना कळून चुकले आहे. त्यामुळे ते हतबल झाले आहेत. हतबलतेत नैराश्याची भर पडते तेव्हा त्यातून निर्माण होणारी मानसिकता अत्यंत घातक असते. सुदैवाने भारताचे ग्रहयोग बरे आहेत, अगदी अनुकूल काळ नसला तरी शनीची साडे साती वगैरे नाही. त्यामुळे जागतिक राजकारणाच्या पटावर सोंगट्या भारताच्या बाजूने पडताना दिसतायत. अमेरीकेत ट्रम्प यांचा विजय झाला.

त्यामुळेच हिंडेनबर्गला आपले दुकान बंद करावे लागले. ट्रम्प जॉर्ज सोरोस यांचे दुकानही बंद पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार राहणार नाहीत. तरीही सोरोस आणि त्यांच्या भारतातील इको सिस्टीमचे भारत अस्थिर करण्याचे त्यांचे मनसुबे मात्र
कायम आहेत. भारताला कमजोर करायचे असेल तर ते भारतातील लोकशाही व्यवस्थेला कमजोर केल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे झुकरबर्ग यांच्यासारख्या लोकांच्या तोंडून, विदेशी मीडियाच्या माध्यमातून भारतील लोकशाही बाबत संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू राहील. राहुल गांधी यांना मसाला पुरवत राहण्याचे काम विदेशी शक्ती करत राहणार आहेत. देशात काँग्रेसची उणीपुरी ताकद आजही आहे. त्या शिवाय त्यांच्या १०० जागा जिंकून येऊ शकत नाहीत. अल्पसंख्य समाज राहुल गांधी यांच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहणार आहे. परंतु जोपर्यंत देशातील बहुसंख्य जनतेचा विवेक शाबूत आहे, तोपर्यंत भारत पेटवण्याचे त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ शकत नाहीत. जनता एक आहे, तोपर्यंत देश सेफ आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
228,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा