अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच मोठमोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा जणू धडाका लावला आहे. अध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्याच भाषणात ट्रम्प यांनी अमेरिकेचा सुवर्णकाळ आतापासून सुरू होत असल्याचे सांगत इमिग्रेशन, ऊर्जा, लष्करी आणि फेडरल वर्कफोर्स यासह त्यांच्या प्रचारातील अनेक वचने अंमलात आणण्यासाठी पावले उचलण्याची सुरुवात केली. ट्रम्प यांच्या धडाकेबाज निर्णयांचा परिणाम प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जगभरातील अनेक देशांवर पडणार असल्याचे आता चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
ट्रम्प यांच्या हातात अमेरिकेच्या सत्तेची धुरा जाणं हे इतर देशांमधील लोकांना कितपत रुचलं आहे याची आकडेवारी रंजक आहे. तर ट्रम्प यांचे अध्यक्षपदी विराजमान होणं हे कोणत्या देशातील नागरिकांच्या पसंतीला उतरले आहे आणि कोणत्या देशाच्या नागरिकांनी ट्रम्प यांना नापसंती दर्शवली आहे याची आकडेवारी समोर आली आहे.
युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांनी देशांमधील हजारो नागरिकांना विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे आकडेवारी केली आहे. त्यांनी नागरिकांना प्रश्न विचारला होता की, डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी झालेली निवड तुमच्या देशासाठी चांगली आहे की वाईट आहे. ट्रम्प हे आपल्या देशासाठी फायद्याचे ठरतील असं सांगणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे.
आकडेवारीमधून दिसून आलं आहे की, भारतातील लोकांना ट्रम्प यांच्यावर कमालीचा विश्वास आहे. ८४ टक्के लोकांचे म्हणणे आहे की ट्रम्प यांचे अध्यक्षपदी येणं हे अत्यंत चांगले आहे. अर्थात हे या भारतीयांचे म्हणणे आहे जे भारतात वास्तव्याला आहे आणि याचं देशात कर भरतात. त्यांना विदेशी जायचे नाही. या ८४ टक्के लोकांच्या पसंतीमागे कारण असू शकते ते ट्रम्प हे आतापर्यंत नेहमी भारताबद्दल सकारात्मक बोलले आहेत. अमेरिका आणि भारत दोन्ही देशांचे संबंध चांगले असून हे संबंध सुधारण्यासाठी ते प्रयत्नशील असणार आहेत, असं ते म्हणतात. अमेरिकेतील उद्योगपती एलोन मस्क यांनीही अशाच काहीशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे भारतातील लोकांना ट्रम्प योग्य वाटत असावेत.
या आकडेवारीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रशिया आहे. रशियामधील ४९ टक्के लोक म्हणतात ट्रम्प सत्तेत येणं चांगले आहे. यामुळे रशियाची परिस्थिती नक्कीच सुधारेल. युक्रेन- रशिया युद्ध थांबेल कारण अमेरिका युक्रेनला मदत करणं बंद करेल असा विश्वास त्या नागरिकांना वाटत आहे. आता याचं प्रश्नाचे उत्तर देताना युक्रेनमधील जास्तीत जास्त लोक म्हणतात की, ट्रम्प युक्रेनसाठी योग्य आहेत का हे माहित नाही. तर, २० टक्के नागरिक म्हणतात कदाचित ट्रम्प योग्य नसतील. फार कमी २६ टक्के लोक म्हणतात ट्रम्प चांगले आहे.
हे ही वाचा :
जयेश मेस्त्री लिखित, दिग्दर्शित ‘जादूचा दिवा’ बालनाट्याला घवघवीत यश
आयसीसी टी- २० पुरुष संघाची घोषणा; रोहित शर्माकडे धुरा
‘आप’च्या बेईमान लोकांच्या यादीत राहुल गांधींचा फोटो!
रिलायन्स भारतात उभारणार जगातील डेटा सेंटर्सच्या तुलनेत तिप्पट क्षमता असलेले सेंटर!
या यादीत शेवटच्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे. ट्रम्प आमच्या देशासाठी योग्य नाहीत असं तिकडचे ६७ टक्के लोक म्हणत आहेत. याचे कारण असे असू शकते की, ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाकडून डॉलर्स मागितले होते. अमेरिकेचे सैन्य तुमच्या देशात राहून तुमचं रक्षण करत आहे, तर त्याचे पैसे द्यावे लागतील. त्यावेळी ट्रम्प यांनी दर वर्षाला पाच अब्ज डॉलर्स मागण्यास सुरुवात केली होती. तर, ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, पाच अब्ज डॉलर्स ही तेव्हाची रक्कम झाली. आता महागाई वाढली आहे त्यामुळे दक्षिण कोरियाकडून १० अब्ज डॉलर्स प्रतिवर्षी मागणार आहे. त्यामुळे ट्रम्प मागणी करत असलेली रक्कम आता सरकार लोकांकडूनचं कर रूपातून वसूल करणार असल्याची शक्यता असल्याने तेथील लोकांना ट्रम्प यांनी सत्तेत येणं फारासे रुचलेले नाही. पुढे ब्रिटनमध्येही ५४ टक्के लोकांना ट्रम्प यांनी सत्तेत येणं पसंत नाही. त्यांची अरेरावीची भाषा त्यांना पसंद पडत नसल्याचे दिसून येत आहे. असेच चित्र युरोपियन देशांमध्ये असून तेथेही ट्रम्प यांना फारशी पसंदी नाही.