हिंदी भाषा सक्तीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेला वाद अखेर काल शांत झाला. हिंदी भाषा सक्तीची नसून ती ऐच्छिक असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, तरीही विरोधक याचे राजकारण करत असल्याचे सत्ताधारी नेत्यांनी म्हटले. दरम्यान, त्रिभाषा सूत्रासाठी काढण्यात आलेले दोनही जीआर राज्य सरकारने रद्द केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल (२९ जून) पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोट ठेवत ‘मराठी माणसे एकत्र येऊ नयेत म्हणून जीआर रद्द केला’ असे म्हटले. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत टोला लगावला.
आज पासून पावसाळी अधिवेशन सुरु झाले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांसह विधानभवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारला शहाणपण सुचले कि नाही हे येत्या दिवसात कळेल, पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला, जर निर्णय रद्द केला नसता येत्या ५ तारखेच्या मोर्चात भाजपा, शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटातले आणि मराठी प्रेमी सहभागी होणार होते, होणार आहेत. सरकारने केविलवाणा प्रयत्न केला, तरीसुद्धा आम्ही त्यांना धन्यावाद देतो.
हे ही वाचा :
नसीरुद्दीन शाहच्या वक्तव्यावर सिनेमे कामगार संघटनेने व्यक्त केली नाराजी
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड वाढण्यासाठी IIT दिल्लीचे पाऊल
मणिपूर: बंदूकधार्यांनी कारमधील चार जणांवर गोळ्या झाडल्या!
त्रिभाषा सुत्रासंदर्भात जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. समिती कोणतीही असो, त्यांनी निर्णय काहीही देवो पण आता सक्तीचा विषय संपला आहे. हिंदी सक्ती आता होवू शकत नाही हे काल मराठी माणसांच्या शक्तीने दाखवून दिले.
ते पुढे म्हणाले, ५ तारखेला विजय मेळावा, मोर्चा काढण्यात येणार आहे. एकजूट महत्वाची आहे आणि येत्या ५ तारखेला त्याचे दर्शन घडेल. सरकारचा एक कुटील डाव होता. पहिला मराठी-अमराठी करायचे, मराठी भाषिकांमध्ये फुट पाडायची. पण ही फुट आणि वाद होत नाहीत हे बघितल्यानंतर मराठी माणूस एकत्र येवू नये म्हणून हा जीआर त्यांना रद्द करावा लागला.
उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आमदार अतुल भातखळकर म्हणाले, ‘मराठी माणसे एकत्र येऊ नयेत म्हणून जीआर रद्द केला’ हे फक्त उद्धव ठाकरेना सुचू शकते.
ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कोणी रोखलंय, तसा जीआर मी काढलेला नाही
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, दोन भावांनी एकत्र येवू नये म्हणून मी असा कोणताही जीआर काढलेला नाही. त्यामुळे त्यांनी एकत्रित यावे, क्रिकेट, हॉकी, टेनिस खेळावे, स्विमिंग करावे, जेवण करावे, आम्हाला काही अडचण नाही.
