एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) चे महासंचालक जी.व्ही.जी. युगंधर यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तिंना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा नियमितपणे आढावा घेण्यात येतो. गुप्तचर यंत्रणांकडून एखाद्याला जास्त संरक्षण देण्याची गरज असल्याचा अहवाल आल्यास अनेकदा सुरक्षा वाढवण्यात येते. युगंधर यांची सुरक्षा गुप्तचर संस्थांच्या सुचनेवरूनच वाढवण्यात आली आहे. गुजरातमध्ये अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानाबाबत सुरू असलेल्या तपासाचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे हा निर्णय अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे.
१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविककडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१ या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाचा टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत अपघात झाला. विमानात ३१४ प्रवासी होते. अपघातात २४१ प्रवाशांसह २६० लोक ठार झाले. काहींना किरकोळ दुखापती झाल्या. अवघा देश हादरवणारी ही घटना होती.
या अपघातामागे काही घातपात होता का? ही चर्चा पहील्या दिवसापासून सुरू आहे. त्याची काही ठोस कारणे आहेत. कॅनडा-अमेरिकेतून कारवाया करणारा खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू याने एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका जीवाला धोका होऊ शकतो, अशा प्रकारच्या धमक्या अनेकदा दिल्या होत्या. त्यामुळे ही चर्चा स्वाभाविक होती.
अहमदाबादेत झालेल्या १२ जून रोजी झालेल्या या अपघातानंतर अमेरिकी शेअर बाजारात बोईंग कंपनीचा शेअर दोन दिवसात सुमारे ७ टक्के कोसळला होता. या अपघाताच्या महिनाभर आधी १४ मे रोजी कतारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत २१० बोईंग विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. हा जगातील आजवरचा सगळ्यात मोठा विमान खरेदी करार होता. विमानांची एकूण किंमत ९७ अब्ज डॉलर इतकी प्रचंड होती. मे मध्ये कतारमध्ये हा करार झाला. जूनमध्ये भारतात एअर इंडियाचा अपघात झाला. या दोन घटनांचा परस्पर काही संबंध होता का? जगात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेकदा परस्पर संबंध असतोच असे नाही, परंतु तो नसतो असेही नाही. जगातील अनेक घातपातांमागे अर्थकारणाची गणितं असतात.
भारतात सुरू असलेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाकडे युरोप-अमेरिकेतील देश किती तटस्थपणे पाहातात हे आपल्याला माहिती आहे. त्यामागेही भारताचे वेगाने दौडणारे अर्थकारण आणि त्यातून या देशांना निर्माण झालेली पोटदुखी आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. जेम्स बॉण्डच्या ‘कसिनो रोयाल’ या सिनेमामध्ये शेअर मार्केटमध्ये अब्जावधींची कमाई करण्यासाठी एक विमान दुर्घटना घडवण्याचा एक प्रसंग आहे. सिनेमात जे दिसते, त्याची प्रेरणा अनेकदा प्रत्यक्षात घडलेल्या घटना असतात.
एअर इंडियाच्या विमानातील विश्वाश कुमार रमेश हा आसन क्रमांक ११-ए वर बसलेला प्रवासी आश्चर्यकारक रित्या बचावला होता. हा ब्रिटनचा रहिवासी होता. सुरक्षा यंत्रणांनी त्याचीही चौकशी केली. परंतु त्याने दिलेल्या माहितीतून घातपाताचा काही ऍंगल उघड झाला नाही.
एअर एक्सिडेंट इन्वेस्टीगेश ब्युरो या भारतीय यंत्रणेवर विमान अपघातांबाबत तपास करण्याची जबाबदारी आहे. एएआयबीने सुरुवातीला तांत्रिक बिघाड असल्याचे गृहीत धरून तपास सुरू केला होता. परंतु घातपाताची शक्यता अगदीच नाकारण्यात आलेली नव्हती. आता विमानाचा ब्लॅक बॉक्स डाटा, विमानतळावरील CCTV असे काही ठोस तपशील तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. विमानाच्या दोन्ही इंजिनात बिघाड घडल्यामुळे हा अपघात घडला होता. हा बिघाड व्हावा म्हणून काही लोकांनी प्रयत्न केले होते काय? या दिशेने आता तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड वाढण्यासाठी IIT दिल्लीचे पाऊल
बीएसएफ, लष्कराकडून घुसखोरीचा प्रयत्न उधळला
भक्तांच्या वाहनाला अपघात; ३ ठार, ९ जखमी
बांगलादेश अत्याचार प्रकरण: सोशल मिडियावरून तो व्हीडीओ हटवा!
मुळात बोईंग ड्रिमलायनरची दोन्ही इंजिने एकाच वेळी बंद पडण्याची घटना अत्यंत दुर्मीळ आहे. एक इंजिन बंद पडल्यास, पर्याय म्हणून दुसरे इंजिन असते. ही दोन्ही इंजिने एकाच वेळी बंद पडल्यामुळे हे विमान कोसळले. विमानाची हायड्रॉलिक यंत्रणा व लँडिंग गियर अचानक निष्क्रिय झाला होता.
नागरी विमानोड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात काही महत्वाची विधाने केलेली आहेत. ही विधाने खळबळजनक आहेत. ‘एएआयबी घातपातासह सर्व पैलूंचा तपास करते आहे’, असे त्यांनी उघड केले. एका बाजूला मोहोळ यांचा हा गौप्यस्फोट येतो, दुसऱ्या बाजूला गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर युगंधर यांची सुरक्षा वाढवली जाते, यात काही तरी थेट संबंध निश्चितपणे आहे. ‘या अपघाताच्या तपासात अनेक यंत्रणा सामील आहेत. समस्या नेमकी इंजिनात होती की इंधन पुरवठ्यासंदर्भात काही विषय होता, याबाबत आम्ही माहिती घेत आहोत’, असेही मोहोळ म्हणाले आहेत.
अपघाताच्या संदर्भात आतापर्यंत चर्चा फक्त इंजिनाची होती. इंधनाबाबत फार कोणी बोलत नव्हते. परंतु मोहोळ यांनी इंधनाचा उल्लेख केल्यामुळे अनेकांच्या भुवया वक्र झाल्या आहेत. इंधन पुरवठ्यात काही दोष होता, की इंधनात होता? इंधनाची रचना बदलण्यासाठी कोणी त्यात काही मिसळले होते काय? कोणी जाणीवपूर्वक “फ्युएल टँक” मध्ये दूषित पदार्थ टाकला होता का? असे अनेक प्रश्न मोहोळ यांच्या विधानानंतर निर्माण झालेले आहेत.
इंधन फ्युएल टॅंकपर्यंत ज्या साखळी मार्फत येते, त्यातील प्रत्येक कडीचा तपास सुरू आहे. इंधन भरणाऱ्या विमानतळाच्या कर्मचाऱ्यांपासून पुरवठादारापर्यंत सगळेच रडारवर आहेत. राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांनी ‘सुरक्षा धोक्याचा संभाव्य अहवाल’ दिला आहे. त्यानुसार काही परकीय किंवा स्थानिक घटकांनी या अपघातात हस्तक्षेप केल्याची शक्यता वर्तवली आहे.एएआयबी प्रमुख युगंधर यांना ‘सीआरपीएफ’ सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. तपास करणाऱ्या अधिकार्याला धोका असल्याचा स्पष्ट इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला असण्याची शक्यता आहे.
कारण युगंधर हेच या प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी आहेत. त्यांना आता सशस्त्र सीआरपीएफच्या कमांडोंची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ही सुरक्षा प्रवासादरम्यान असेल. त्यांचे घर व कार्यालयावरही सुरक्षा ताफा तैनात करण्यात आलेला आहे. त्यांच्या हालचाली गुप्त ठेवण्यात येत आहेत. ही सुरक्षा गृह मंत्रालयाच्या आदेशावरून आणि गुप्तचर संस्थांच्या सूचनेवरून दिली गेली आहे.
दिल्लीतील नवीन एएआयबी लॅबमध्ये कॉकपिट वॉईस रेकॉर्डर आणि फ्लाईट डाटा रेकॉर्डरचे विश्लेषण सुरु आहे. अपघातापूर्वी वैमानिकांमध्ये काय चर्चा झाली याचा अभ्यास करण्यात येत आहे. प्रारंभिक तपासात गोंधळ वाढवणाऱ्या काही बाबी तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलेल्या आहेत. “परकीय हस्तक्षेप” किंवा सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड झाल्याची शक्यता गृहीत धरण्यात आलेली आले.
आपल्या तपास यंत्रणांसह बोईंग आणि जीईची पथकेही तांत्रिक तपासात सामील झाली आहेत. इंजिन, इलेक्ट्रिकल्स, लँडिंग गियर, ब्लॅक बॉक्स यांचा बारकाईने अभ्यास सुरू आहे. या प्रकरणानंतर सरकारने आपल्याकडे असलेल्या सर्व ३३ बोईंग ड्रीम लायनरची कसून तपासणी केली आहे. उड्डाण सुरक्षा नियमांबाबत सरकारने काही सुधारणा केल्या आहेत. एअर इंडिया तसेच ग्राउंड ऑपरेशन्समधील हलगर्जीपणावर कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणात घातपात सिद्ध झाला तर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला हे नवे आव्हान ठरू शकेल. सामान्य अपघात म्हणून सुरू झालेला तपास आता घातपाताच्या दिशेने वळलेला आहे. एअर इंडियाच्या फ्लाईट एआय-१७१ चे सत्य काय, हे येत्या तीन महिन्यात अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईलच. परंतु मुख्य तपास अधिकार्याला सुरक्षा देण्याचा निर्णय हा काहीतरी गंभीर घडले आहे, याकडे अंगुली निर्देश करतो आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
