बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या घटनेचा संताप संपूर्ण राज्यात व्यक्त केला जात होता. या घटनेतील आरोपी अटकेत असून त्यांच्यावर माकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती.
या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला होता. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले धक्कादायक फोटो समोर समोर आल्यानंतर सोमवार, ३ मार्च रोजी रात्री उशिरा राजकीय घडामोडींना वेग आला. देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती होती. यानंतर मंगळवार, ४ मार्च रोजी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यांचे पीए यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला असून तो राजीनामा मी स्वीकारला आहे. आता पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. धनंजय मुंडे यांना पदमुक्त करण्यात आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी असून गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिक कराड हा त्यांच्या निवडणुकीतील प्रचाराची आणि त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील कारभाराची सूत्रे हाताळत होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यापासून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अनेक नेत्यांकडून केली जात होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली होती. अखेर सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे.
हे ही वाचा :
बैठकीत झालेल्या बाचाबाचीनंतर ट्रम्प यांनी युक्रेनची लष्करी मदत थांबवली
आयआयटी बाबा अभय सिंहकडे सापडले गांजाचे पाकीट!
अलाहाबादियाला पश्चात्ताप होईल अशी आशा व्यक्त करत पॉडकास्ट सुरू करण्यास परवानगी!
संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे सुन्न करणारे फोटो माध्यमांनी समोर आणले. यानंतर संतापाची लाट उसळली आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त करण्यात आले आहेत. आरोपी महेश केदारच्या फोनमधून जवळपास १५ व्हिडीओ आणि ८ फोटो जप्त करण्यात आलेत. या व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपीही दिसत आहेत.