पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे आयोजित जाहीर सभेत तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी TMC सरकारला “निर्ममता की सरकार” असं संबोधत आरोप केला की ही सरकार गरिबांच्या आणि सामान्य जनतेच्या हिताच्या विरोधात काम करत आहे. त्यांनी व्यासपीठावरून म्हटलं, “बंगाल मधील जनतेचा आक्रोश आहे – मची है चीख पुकार, नहीं चाहिए निर्ममता की सरकार!”
पंतप्रधान मोदींनी मुर्शिदाबाद आणि मालदा येथील घटनांचा उल्लेख करत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
या सभेदरम्यान मोदींनी अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यांमध्ये सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन प्रकल्पाची पायाभरणी केली. या योजनेमुळे २.५ लाखांहून अधिक घरांमध्ये पाइपद्वारे स्वस्त आणि सुरक्षित गॅस पुरवठा होणार आहे. यामुळे सिलेंडर खरेदीचा त्रास कमी होईल आणि स्वच्छ ऊर्जा मिळेल. त्यांनी ही योजना केंद्र सरकारच्या ‘डोअरस्टेप डिलिव्हरी’च्या संकल्पनेचं उदाहरण म्हणून सादर केलं.
आयुष्मान भारत योजना लागू न करण्यावर टीका
आयुष्मान भारत योजनेचा उल्लेख करत मोदींनी टीका केली की, TMC सरकारने ही योजना बंगालमध्ये लागू होऊ दिली नाही, त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोफत उपचाराचा लाभ मिळू शकलेला नाही. केंद्र सरकारच्या घरकुल योजनेबाबतही मोदींनी आरोप केला की TMC कार्यकर्ते गरीबांकडून ‘कट मनी’ घेत आहेत आणि त्यामुळे हजारो लोकांना घर मिळू शकलेलं नाही.
हे ही वाचा:
‘माझ्या वक्तव्यांचा स्वार्थासाठी विपर्यास, उदित राज यांचे वक्तव्य अतिउत्साहातून’
‘ताम्रजल’ ने करा दिवसाची सुरुवात, ठेवते हृदयाचे आरोग्य
छत्तीसगडचा बस्तर ४० वर्षांनी ‘नक्षलमुक्त’
विश्वकर्मा योजनेबद्दल मोदी म्हणाले की, लाखो लोकांना या योजनेंतर्गत प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य दिलं जात आहे, पण बंगालमध्ये आठ लाख अर्ज प्रलंबित ठेवले गेले आहेत. मोदींनी म्हटलं की, TMC सरकारच्या काळात हजारो शिक्षकांचं भवितव्य उद्ध्वस्त झालं आणि लाखो विद्यार्थ्यांचं शिक्षण अंधारात ढकललं गेलं. त्यांनी कोर्टावर दोष टाकून स्वतःची चूक झाकण्याचा आरोपही केला.
मोदींनी चहा बागांतील मजुरांच्या उत्पन्नावर लूट झाल्याचा आरोप केला आणि म्हटलं की दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पश्चिम बंगालचा विकास महत्त्वाचा
पंतप्रधान मोदी म्हणाले की पश्चिम बंगालचा विकास म्हणजे भारताच्या भविष्याची पायाभरणी. केंद्र सरकारने राज्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत, ज्यामध्ये दुर्गापूर एक्सप्रेसवे आणि श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्टचं आधुनिकीकरण यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये देशात १४ कोटी एलपीजी कनेक्शन होते, जे आता ३१ कोटींपेक्षा जास्त झाले आहेत. गॅस वितरण नेटवर्क दुपटीने वाढलं आहे.
‘मेक इन इंडिया’ आणि ज्ञान केंद्र
मोदींनी म्हटलं की विकसीत भारतासाठी पश्चिम बंगालचं प्रगतीशील असणं गरजेचं आहे. त्यासाठी बंगालला ज्ञान आणि ‘मेक इन इंडिया’चं केंद्र बनवण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारच्या ‘पूर्वोदय’ धोरणाखाली मागील १० वर्षांत राज्यात हजारो कोटींचा गुंतवणूक झाला आहे.
सांस्कृतिक आणि भौगोलिक महत्त्व
अखेर, पंतप्रधानांनी अलीपुरद्वारच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक महत्त्वाचा उल्लेख केला आणि म्हटलं की हे क्षेत्र भूतानच्या सीमेला लागून आहे, तसेच आसाम, जलपायगुडी आणि कूचबिहारशी जोडलेलं आहे. त्यांनी बंगालला नव्या उर्जेसह पुढे जाण्याचं आवाहन केलं.
