बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी भेट घेतली. यावेळी देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी इथे भाषण करायला आलेले नसून फक्त कुटुंबाची भेट घ्यायला आले आहे. आपलं मूल जाणं यापेक्षा मोठं दुःख कोणत्याही आईसाठी नाही. माझ्या मावशीचा मुलगा असाच खूप लहान वयात गेला. त्या घटनेला २०-२५ वर्षे झाली असतील तरी मावशी ते विसरू शकलेली नाही. एका आईचं दुःख, एका बहिणीचं दुःख, लेकीचं, मुलाचं दुःख मोठे आहे. खरंच या कुटुंबाला कधी न्याय देऊ शकू का? ज्या बाबासाहेबांनी संविधान दिले, अधिकार दिले, त्याच देशात एका कुटुंबाला ७० दिवस झाले न्याय मिळत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक सुसंस्कृत नेते आहेत. संतोष देशमुख यांचे कुटंबीय त्यांना भेटले तेव्हा त्यांना आठ दिवसांत न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. राजकारण चालत राहतं, पण अशा घटनेनंतर नेतृत्त्वाने एक संदेश दिला पाहिजे. हे राज्य आता मी चालवतो, या राज्यात मी असली कुठलीही कृती सहन करणार नाही. हे प्रत्येक पोलिसाला कळाले पाहिजे, तो सिग्नल वरुन गेला पाहिजे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुल-आंबेडकरांच्या संस्कारानेच चालेल, हा संदेश गेला पाहिजे. आता मी खासदार म्हणून नाही तर महाराष्ट्रातील एक महिला म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे आणि पदर पुढे करून न्याय मागणार आहे, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. खासदार बजरंग सोनावणे आणि त्यांनी घेतलेल्या भेटीत अमित शाह यांनी स्वतः या विषयात लक्ष घालतील असा शब्द दिल्याचे त्या म्हणाल्या. आम्ही लोकशाही पद्धतीने गृहमंत्र्यांना विनंती केली. यामध्ये पोलीस किंवा अधिकारी कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करु नका. न्याय मिळणार नसेल तर काय करायची सत्ता, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
हे ही वाचा :
‘मी परत येईन, म्हणूनच अल्लाहने मला जिवंत ठेवले’
दरोड्याचा बनाव रचणाऱ्या ‘आप’ नेत्यानेचं पत्नीच्या हत्येसाठी पाठवले होते हल्लेखोर
३० वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी जोडप्यासह त्यांच्या मुलाला अटक
नोकरीची संधी देत टेस्लाकडून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
बीडमधील गुंडगिरी थांबली पाहिजे. बीडमधील महिलांना मोकळेपणाने फिरता आले पाहिजे. वाल्मिक कराड व्हिडिओ काढून पोलिसांना सांगत आहे की, मी येत आहे. ज्या वेळी हत्या झाली त्या वेळीचे सीडीआर काढा, कृष्णा आंधळेचे सीडीआर मिळाले पाहिजेत. वाल्मिक कराडच्या मागे ईडी कशी लागली नाही? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.