भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्राचे संस्कार लाभले. तिचे आई-वडील दोघेही राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटू असल्याने खेळाची प्रेरणा तिला घरातूनच मिळाली. आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर सिंधूने भारतीय बॅडमिंटनला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी दोन वैयक्तिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.
५ जुलै १९९५ रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या सिंधूने २००१ मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुलेला गोपीचंद यांच्या ऐतिहासिक विजयानंतर बॅडमिंटन खेळण्याचा निर्धार केला. अवघ्या ८ व्या वर्षी तिने हातात रॅकेट घेतले आणि नंतर गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत प्रवेश घेऊन कठोर सराव सुरू केला. खेळासाठी पूर्णपणे समर्पित असलेल्या सिंधूने प्रशिक्षणाच्या काळात दीर्घकाळ मोबाईल फोनपासूनही स्वतःला दूर ठेवले.
राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केल्यानंतर सिंधूने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही आपली छाप पाडली. २०११ मध्ये अवघ्या १६ व्या वर्षी तिने मालदीव इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर २०१२ मध्ये आशियाई ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक, तर २०१३ मध्ये मलेशिया ओपन ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद मिळवले.
२०१६ हे वर्ष सिंधूसाठी विशेष ठरले. तिने चायना ओपनचे विजेतेपद जिंकत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्यपदक मिळवले. त्यानंतर २०१९ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकत तिने आणखी एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला.
२०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या सिंधूने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी भारताची पहिली खेळाडू म्हणून तिचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले.
बॅडमिंटनमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल सिंधूला २०१३ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०१६ मध्ये राजीव गांधी खेलरत्न (आताचे मेजर ध्यानचंद खेलरत्न) आणि २०२० मध्ये पद्मभूषण या देशातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पी. व्ही. सिंधूचा प्रवास आजही लाखो युवा खेळाडूंना मेहनत, शिस्त आणि जिद्दीची प्रेरणा देणारा ठरत आहे.







