थंड करून खा… हा राजकारणाचा नियम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेच केले, वादग्रस्त धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. देवेंद्र फडणवीस हे मुंडे यांचे मित्र आहेत. ते त्यांना धक्का लावणार नाहीत. असे काही लोक छातीवर हात ठेवून सांगत असताना, हा राजीनामा झालेला आहे. देवाच्या काठीला आवाज नसतो, देवाभाऊंच्या काठीलाही नसतो. हा राजीनामा आधीच व्हायला हवा होता, असे आता काही लोक म्हणतील, परंतु आघाडीच्या सरकारच्या चौकटीत काम करताना असे निर्णय होत नाही. त्यामुळे योग्य वेळ येताच राजीनामा घेऊन ‘मीच बॉस आहे’, हे फडणवीसांनी या निमित्ताने निर्विवादपणे सिद्ध केलेले आहे. हाकलेपर्यंत वाट पाहून मुंडे यांनी स्वत:च्या राजकीय कारकीर्दीची कबर खणली आहे.