पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे झालेल्या आत्मघातकी स्फोटात १३ सैनिक ठार झाले. तर अनेक जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था एएफपीच्या मते, हा हल्ला अफगाणिस्तान सीमेजवळील खैबर पख्तूनख्वा प्रांतात झाला. दरम्यान, या आत्मघातकी बॉम्बस्फोटाची जबाबदारी पाकिस्तान तालिबानशी (टीटीपी) संलग्न असलेल्या हाफिज गुल बहादूर गटाच्या आत्मघाती युनिटने स्वीकारली आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील एका स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, “एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर आदळवले. या स्फोटात १३ सैनिक ठार झाले, १० लष्करी कर्मचारी आणि १९ नागरिक जखमी झाले.”
“स्फोटामुळे दोन घरांचे छप्परही कोसळले आणि सहा मुले जखमी झाली,” असे खैबर पख्तूनख्वा येथे तैनात असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले. हल्ल्यानंतर चार जखमी सैनिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
२०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात हिंसाचार वाढला आहे, इस्लामाबादने काबुलवर सीमापार हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप केला आहे. मात्र, हा आरोप अफगाण तालिबान अजूनही नाकारत आहे. एएफपीच्या आकडेवारीनुसार, वर्षाच्या सुरुवातीपासून खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये सरकारविरोधी सशस्त्र गटांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे २९० लोक, ज्यात बहुतेक सुरक्षा कर्मचारी होते, मारले गेले आहेत.
हे ही वाचा :
RAW च्या प्रमुखपदी आयपीएस पराग जैन!
“समाजवाद” आणि “धर्मनिरपेक्ष” हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत असावेत का ?
सुंदर दिसण्यासाठी घेत होती औषधे, ‘काँटा लगा’ फेम शेफाली जरीवालाचा मृत्यू!
शेफाली जरीवालासह बिग बॉसमधील ‘या’ स्पर्धकांनी अचानक सोडले जग!
या भागात दररोज अशांतता पसरत आहे आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेकडून हल्ले होत असल्याचे दिसून आले आहे. मार्चच्या मध्यात टीटीपीने सुरक्षा दलांविरुद्ध मोहीम जाहीर केली होती, ज्यामध्ये त्यांनी घातपाती हल्ले आणि आत्मघातकी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून, या संघटनेने खैबर पख्तूनख्वा प्रदेशात सुमारे १०० हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
