आयआयटी बॉम्बे तुर्की विद्यापिठांसोबतचे सर्व करार रद्द केले आहेत. तुर्कीने भारताविरुद्ध पाकिस्तानला दिलेल्या समर्थनामुळे देशभरात संतापाची लाट आहे. पुढची सूचना मिळेपर्यंत तुर्कीसोबतचे संपूर्ण शैक्षणिक करार रद्द करण्यात आले आहेत. देशाच्या सुरक्षेला आणि हितांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे आयआयटी बॉम्बेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
भारत-पाक युद्धादरम्यान पाकला पाठीमागून मदत करणाऱ्या तुर्कीला भारताने दणके द्यायला सुरुवात केली आहे. युद्धादरम्यान तुर्कीने केवळ ड्रोनच नाहीतर त्यासाठी लष्कराचे जवान देखील पाठवले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर भारताकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे देशभरातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. अनेक व्यापारांनी तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार टाकला आहे. तुर्कीचा माल न घेण्याचे आवाहन देखील नागरिकांना केले आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने पहिली कारवाई करत देशातील नऊ विमानतळांवर सेवा देणाऱ्या तुर्कीच्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केली होती.
भारतातून तुर्कीविरुद्ध रोष व्यक्त होत असताना आयआयटी बॉम्बेने देखील तुर्की विद्यापिठांसोबतचे सर्व शैक्षणिक करार रद्द केले आहेत. संस्थेने म्हटले आहे की पुढील सूचना मिळेपर्यंत तुर्कीयेसोबतचे शैक्षणिक सहकार्य स्थगित राहील. यापूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून तुर्कीयेच्या इनोनू विद्यापीठासोबतचा शैक्षणिक सामंजस्य करार रद्द करण्याची घोषणा केली होती. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव, जेएनयू आणि इनोनू विद्यापीठ, तुर्की यांच्यातील सामंजस्य करार पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले होते.
त्याच वेळी, जामिया मिलिया इस्लामियानेही राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत तुर्की संस्थांसोबतचे सर्व प्रकारचे सहकार्य थांबवण्याची घोषणा केली आहे. आयआयटी रुरकीने तुर्कीतील इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करारही औपचारिकपणे रद्द केला आहे.
हे ही वाचा :
युरोपीय संघाने काय विनंती केली इस्रायलला ?
२०० प्रवाशांसह मेक्सिकन नौदलाचे जहाज ब्रुकलिन ब्रिजवर आदळले!
भारताने बांग्लादेशच्या कोणत्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली ?
बस २० फूट खोल दरीत कोसळली, ३० प्रवासी जखमी
दरम्यान, आयआयटी बॉम्बेने घेतलेल्या निर्णयाचे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले, आयआयटी बॉम्बेचे अभिनंदन, तुर्की सारखा देश विनाकारण दहशतवादाला पाठींबा देत आहे. मानवतेच्या विरुद्ध जो देश आहे, त्या अपराधाला तो पाठींबा देतोय. अशा तुर्कीवर अघोषित बहिष्कार भारतीयांनी टाकला आहे. तुर्कीला देखील लक्षात आले आहे कि भारतीयांची ताकद काय आहे.
