तामिळनाडूच्या वलपराईजवळ रविवारी तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाची (TNSTC) एक बस २० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात बसमधील ३० प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे सुमारे ३ वाजता वलपराई घाट विभागातील वळणदार डोंगर रस्त्यावर कावर्स इस्टेट भागाजवळ घडली. ७२ प्रवाशांना घेऊन निघालेली ही बस तिरुपूरहून वलपराईकडे जात होती. डोंगराळ भागातील एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस रस्त्यावरून घसरून थेट दरीत कोसळली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सर्व प्रवासी या अपघातातून बचावले असले तरी काहींना गंभीर जखमा झाल्या आहेत. काहींचे हाड मोडले असून काहींना खोल काप आणि जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच वलपराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. १०८ रुग्णवाहिका सेवांनी तत्काळ बचावकार्य सुरू केलं.
हेही वाचा..
‘मी नरकात जाईन, पण पाकिस्तानात…’
देहरादूनमध्ये ६ बांगलादेशी नागरिकांना अटक
चारमिनारजवळ भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू
स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुर्गम भागातून जखमींना बाहेर काढण्यात आले आणि वलपराई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. बसचालक गणेश (४९) गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी पोलाची शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रुग्णालय सूत्रांनुसार, चालकाची प्रकृती सध्या स्थिर आहे, परंतु त्याच्यावर पुढील वैद्यकीय देखरेख ठेवण्याची गरज आहे. वलपराई सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, बहुतांश जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना विशेष उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाने अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात, अपघातावेळी सकाळची कमी दृश्यता आणि रस्त्यावरील घसरन या गोष्टी संभाव्य कारणे असू शकतात, असे स्पष्ट झाले आहे. परिवहन विभागाचे अधिकारी बस आणि अपघातस्थळाची सविस्तर पाहणी करतील, आणि चौकशी पूर्ण झाल्यावर अपघाताचे खरे कारण समोर येईल.
