दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल म्हणजेच शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. भाजपाने ७० पैकी ४८ जागा जिंकत मोठा विजय मिळविला. तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत भाजप पुन्हा सत्तेत आली आहे. निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. ‘आप’च्या पराभवानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आज (९ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता दिल्लीच्या राज्यपालांकडे राजीनामा सादर केला आहे. कालकाजी मतदारसंघातून आतिशी विजयी झाल्या तर पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांचे निवासस्थान सोडले आणि उपराज्यपालांना आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर भाजप हायकमांड मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याचा विचार करत आहे. यासाठी लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली जाईल, ज्यामध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे.
हे ही वाचा :
आम आदमी पक्षाची चौकशी करणार, लुटलेल्याची भरपाई करावी लागणार!
भाजपाचा विजय आणि केजरीवालांचा ‘तो’ व्हिडीओ; दिल्ली निवडणुकीची सोशल मीडियावर चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्यांमध्ये पहिले नाव प्रवेश वर्मा यांचे आहे. मनजिंदर सिंग सिरसा यांच्याही नावाची चर्चा आहे. वीरेंद्र सचदेवा यांचे नावही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. पूर्वांचलला आकर्षित करण्यासाठी, भाजप नेते कपिल मिश्रा यांना दिल्लीच्या नवीन मंत्रिमंडळात मंत्री बनवले जाऊ शकते. दिल्ली सरकारमध्ये एक महिला देखील मंत्री होवू शकते, ज्यामध्ये रेखा गुप्ता यांचा विचार केला जात आहे.