भारताची प्रसिद्ध महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने महिला दिनाच्या निमित्ताने आपले विचार मांडले आहेत. तिने केवळ वैयक्तिक अनुभव मांडले नाहीत, तर समाजातील बदलत्या परिस्थिती आणि महिलांच्या भूमिकेवरही आपली मत मांडली आहेत. महिलांच्या संघर्ष आणि योगदानाला केवळ एका दिवसापुरते मर्यादित ठेवू नये असे ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक हिने आपले मत मांडले.
साक्षी मलिक म्हणाली की महिलांचा सन्मान केवळ एका विशिष्ट दिवशी, म्हणजे ८ मार्च रोजी साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनापुरताच मर्यादित नसावा. तिच्या मते, प्रत्येक दिवस महिला दिन असावा. तिने आपल्या जीवनातील उदाहरण देऊन सांगितले की एक महिला आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या संघर्षांना सामोरे जाते.
साक्षी म्हणाली, “जेव्हा मी कुस्ती सुरू केली होती, तेव्हा मला खूप कमी संसाधनांमध्ये सराव करावा लागला. या अडचणींवर मात करून मी केवळ माझ्या कारकिर्दीत यश मिळवले नाही, तर आई झाल्यानंतरही माझे काम संतुलितपणे पार पाडले. एका आईवर अनेक जबाबदाऱ्या असतात आणि ती सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळू शकते. त्यामुळे महिलांच्या योगदानाचा सन्मान रोज व्हायला हवा.”
साक्षी म्हणाली की पूर्वी हरियाणामध्ये मुलगा आणि मुलीमध्ये खूप भेदभाव केला जात असे. पण आता परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. तिने आपल्या पदक जिंकल्याच्या अनुभवाबद्दल सांगितले की, तिच्या यशाने समाजाची मानसिकता बदलण्यास मदत केली. महिला खेळाडूंच्या कारकीर्दींवर चित्रपट तयार झाले, त्यानंतर लोक आपल्या मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करू लागले. आज मुली प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, मग तो खेळ असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र. तिने अलीकडील ऑलिम्पिकचा दाखला देत हरियाणाच्या मनू भाकर हिने इतिहास रचल्याचे सांगितले आणि सिद्ध केले की मुली कुणापेक्षा कमी नाहीत.
हेही वाचा :
पश्चिम बंगाल: शितला मातेच्या मूर्तीची कट्टरवाद्यांकडून तोडफोड करत जाळपोळ!
शिंदेंच्या प्रकल्पांना स्थगिती दिल्याच्या बातम्या येतात, पण स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही!
महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांतील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात
दहशतवादी तहव्वूर राणाला दणका! प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली
साक्षीच्या मते, “जर एखादी महिला आपल्या उद्दिष्टावर ठाम, लक्ष केंद्रित करणारी आणि शिस्तबद्ध असेल, तर ती काहीही मिळवू शकते.” तिने महिला खेळाडूंना येणाऱ्या अडचणींचा देखील उल्लेख केला.
तिने सांगितले, “महिला खेळाडूंची कारकीर्द फार मोठी नसते. आम्हाला फार काळ खेळ सुरू ठेवता येत नाही, कारण खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. माझा महिला खेळाडूंना सांगणे आहे की कोणतीही भीती न बाळगता, निर्धास्तपणे आपली सर्वोत्तम कामगिरी करा. आम्हीही अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, लढायला शिकलो आणि आंदोलनही केले. मी एवढेच सांगेन की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, सतत प्रयत्न करत राहा. देशासाठी चांगले कार्य करत राहा.”
महिला खेळाडूंना संदेश देताना साक्षी म्हणाली, “तुमचे लक्ष्य ठरवा आणि प्रामाणिकपणे त्यावर काम करा. तुम्हाला १०० टक्के यश मिळेल. माझा हा जीवनानुभव आहे.”